पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑनलाइन शिकवणी मंच ‘बायजू’च्या ताळेबंद आणि खतावण्यांची तातडीने तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कंपनी व्यवहार मंत्रालयाने आपल्या अधिकाऱ्यांना सोमवारी दिले. यामुळे आधीच शड्डू ठोकून उभे राहिलेले गुंतवणूकदार, बडे भागधारक आणि कर्जदात्या संस्थांमुळे संकटांनी वेढलेल्या कंपनीपुढील अडचणींच्या मालिकेत ताजी भर पडली आहे.  

बायजूच्या ताळेबंदाच्या तपासणीचा अहवाल कंपनी व्यवहार विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून मंत्रालयाकडे पाठविला जाईल. यानंतर बाजयूबाबत सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने जुलै २०२३ मध्ये हैदराबादमधील प्रादेशिक संचालक कार्यालयाला बायजूची प्रवर्तक असलेल्या ‘थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. ही कंपनी बंगळुरूस्थित असून, ती बायजूच्या नाममुद्रेखाली व्यवसाय करते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बायजूच्या खतावण्यांची लवकरात लवकर तपासणी पूर्ण करून, त्या संबंधाने अहवाल सादर करण्यास मंत्रालयाने सांगितले आहे.

हेही वाचा >>>‘पेटीएम’ ॲप कार्यान्वित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेची ‘एनपीसीआय’ला मदतीचे आर्जव

गेल्या वर्षी बायजूने आर्थिक ताळेबंद सादर करण्यात असमर्थता दर्शविली होती. कारण कंपनीच्या लेखापरीक्षक डेलॉइटने त्यासाठी नकार दर्शवून, राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर कंपनी व्यवहार मंत्रालयाने बायजूच्या ताळेबंदाच्या तपासणीचा आदेश दिला होता. तसेच, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इंडिया (आयसीएआय) ही संस्थाही बायजूने मागील काही आर्थिक वर्षात सादर केलेले आर्थिक ताळेबंद तपासत आहे.

बायजूच्या प्रवक्त्यानेही तपासणी चालू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि कंपनीकडून वेळोवेळी विनंती करण्यात आलेल्या माहिती आणि कागदपत्रांची पूर्तता केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात २३ फेब्रुवारीला बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत, बायजूच्या प्रमुख भागधारकांनी संस्थापक मुख्याधिकारी बायजू रवींद्रन आणि कुटुंबीयांना कथित ‘गैरव्यवस्थापन आणि अपयश’ या कारणावरून कंपनीवरून पदच्युत करण्यासाठी एकमताने कौल दिला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ministry of company affairs ordered its officials to immediately inspect the balance sheet and balance sheets of byju and submit its report print eco news amy