Mumbai Housing Deal: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत महागड्या घरांची खरेदी-विक्री सातत्याने होत असते. मैसन सिया(Maison Sia)च्या सीईओ व्रतिका गुप्ता यांनी सुमारे ११६ कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे. हे घर मुंबईच्या उच्चभ्रू भागात असलेल्या वरळीमधील ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्टमध्ये खरेदी करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
व्रतिका गुप्ता मेसन सिया नावाचे लक्झरी होम डेकोर स्टोअर चालवते
गेल्या वर्षी याच ठिकाणी डी’मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी १२३८ कोटी रुपयांचा करार केला होता. यानंतर वरळीतील ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट चर्चेत आले. व्रतिका गुप्ता मेसन सिया नावाचे लक्झरी होम डेकोर स्टोअर चालवते. तिने ११६.२ कोटी रुपये खर्च करून सी व्ह्यू लक्झरी घर खरेदी केले आहे. २०२४ मधील हा १०० कोटींहून अधिक किमतीचा पहिला गृहनिर्माण करार मानला जात आहे.
घराची किंमत एक लाख रुपये प्रति चौरस फूट अंदाजित
३९ वर्षीय व्रतिका गुप्ताचे हे अपार्टमेंट १२,१३८ स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. इंडेक्स टॅप (IndexTap.com) नुसार, त्याची किंमत १ लाख रुपये प्रति चौरस फूट अंदाजित करण्यात आली आहे. या करारासाठी अंदाजे ५.८२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. या मालमत्तेची ७ जानेवारीला नोंदणी झाली. व्रतिका गुप्ताला या करारामधून ८ पार्किंग स्लॉटही मिळाले आहेत.
हेही वाचाः सिटी ग्रुप २० हजार कर्मचार्यांना कामावरून काढणार, १.८ अब्ज डॉलर्सच्या नुकसानीनंतर घेतला निर्णय
कोण आहे व्रतिका गुप्ता?
व्रतिका गुप्ता देशातील टॉप डिझायनर मेसन सिया स्टोअर चालवते. मेसन सिया घर सजवण्याच्या उत्पादनांची विक्री करते. तिला महागडे करार करण्यासाठी ओळखले जातो. व्रत्तिका गुप्ता ही रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज खरेदी करणारी देशातील पहिली महिला आहे, असा दावाही यापूर्वी करण्यात आला होता. या सुंदर कारची किंमत अंदाजे १२.२५ कोटी रुपये आहे.
मेसन सिया कंपनी २०२२ मध्ये उघडण्यात आली
इंडेक्स टॅपनुसार, व्रतिका गुप्ता यांनी २०२२ मध्ये मेसन सिया या कंपनीची स्थापना केली. तिला नवनवीन ठिकाणी भेटी देऊन अनोखे डिझाईन्स बनवण्याची आवड आहे. ती बाजारात इंटेरिअर डेकोरेशनची महागडी उत्पादने विकते. डिझायनर म्हणून तिने करिअरची सुरुवात केली. तिने पर्ल अकॅडमी ऑफ फॅशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मधून शिक्षण घेतले आहे.
गेल्या वर्षी देशात ५८ आलिशान घरांची विक्री
एनरॉकच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी देशातील टॉप ७ शहरांमध्ये ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची ५८ अल्ट्रा लक्झरी घरे विकली गेली. त्यापैकी ५३ महागडी घरे फक्त मुंबईत विकली गेली. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शहरात १,१४,६५२ मालमत्तांची विक्री झाली. २०२२ च्या तुलनेत यामध्ये सुमारे २ टक्के वाढ झाली आहे. २०२२ मध्ये मुंबईत १,१२,६६८ मालमत्तांची नोंदणी झाली होती.