मुंबई : राज्यात अलीकडे वाढलेले आगीचे अपघात आणि त्यामुळे होणारे जीवित व मालमत्तेचे नुकसान पाहता, महाराष्ट्र राज्य सरकारने अग्निसुरक्षा विधेयक मांडण्याच्या पावलाचे मुख्यतः विद्युतसामग्री उद्योगाने स्वागत केले आहे. तथापि, आगीच्या अपघातांचे मुख्य कारण म्हणजे निकृष्ट दर्जाच्या विजेच्या तारा आणि केबल्सचा वापर हे असून, नेमके त्याबाबतीत प्रस्तावित कायद्यात कोणताही दंडक नसल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त उपायुक्त (आपत्कालीन कक्ष) आणि माजी अग्निशमन अधिकारी पी. एस. रहांगदळे यांनी नवीन अग्निसुरक्षा नियमांना कायदेशीर चौकट प्रदान करताना, चांगल्या गुणवत्तेच्या विजेच्या तारांच्या वापराच्या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते, असे मत व्यक्त केले. किंबहुना बांधकाम विकासकांना असा दंडक घालून दिला जायला हवा आणि त्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर दंडाची तरतूद हवी, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – सरकारी कंपन्यांच्या संचालकांच्या नियुक्तीलाही भागधारकांच्या मंजुरी मोहोर आवश्यक – सेबी
देशात रस्ते अपघातानंतर सर्वाधिक मृत्यू हे आगीच्या अपघाताने होतात आणि बहुतांश आगीच्या घटनांमागे निकृष्ट दर्जाच्या विद्युत तारा आणि सामग्री हे कारण असते, तर ७८ टक्के मृत्यू हे भाजण्यामुळे नव्हे, तर आगीच्या घटनांमध्ये विजेच्या तारा जळाल्याने फैलावणारी विषारी वायू आणि धुरामुळे श्वास कोंडल्याने होतात, असे दिसून आल्याचे आरआर केबलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीगोपाल काब्रा म्हणाले. तारा आणि केबल उत्पादकांचे उद्दिष्ट हे ‘एलएसओएच’ अर्थात कमी धूर व विषारी वायू सोडणाऱ्या तारांचे उत्पादन व वापरास प्रोत्साहन देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – ‘यूपीआय’ सुविधेचा आणखी विस्तार; रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव
इमारतीच्या संरचनेत आज अग्निसुरक्षा हे महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले असून, चांगल्या दर्जाच्या विजेच्या तारा व केबल वापरल्याने बांधकाम खर्चात लक्षणीय वाढही संभवत नाही, असा निर्वाळा क्रेडाई-एमसीएचआय – ठाणे विभागाचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिला. ज्या अर्थी खर्च वाढत नाही याचाच अर्थ दर्जेदार विद्युत सामग्री न वापरल्याने खर्चात मोठी बचतही शक्य नाही, तर मग घर खरेदीदारांचा जीव धोक्यात घालणारी ही सौदेबाजी कशासाठी, असा सवाल करीत जागरूकता आणि प्रबोधनाची गरज असल्याचे मेहता यांनीही मान्य केले.