Trade War Between Mukesh Ambani And Elon Musk : भारताची बाजारपेठ आता अब्जाधीशांच्या ‘ट्रेड वॉर’चा आखाडा बनू शकते. यामध्ये एका बाजूला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी असतील तर दुसऱ्या बाजूला टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क असतील, जे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. पण थांबा हे दोघे खरोखर युद्ध करणार नाहीत. पण लवकरच हे दोघे बाजारात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात एलॉन मस्क यांची भेट घेतली आणि त्यांना भारतात टेस्ला कारखाना सुरू करण्याचे आमंत्रण दिले. यानंतर एलॉन मस्क यांनीही भारतात येण्याचे संकेत दिले आणि तेही म्हणाले की, ते त्यांची ‘स्टारलिंक’ भारतात आणू इच्छितात. त्यामुळे खरं तर ही स्टारलिंकच खऱ्या ‘युद्धा’चे कारण ठरू शकते.

‘स्टारलिंक’ जिओच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची शक्यता

खरं तर एलॉन मस्क यांना त्यांचा स्टारलिंक उपग्रह ब्रॉडबँड भारतात आणायचा आहे. अशा प्रकारे त्यांना प्रत्येक गावात ब्रॉडबँड पोहोचवायचे आहे. पण आपल्या या निर्णयाचा सरकारच्या सॅटेलाइट ब्रॉडबँड लिलावावर कसा परिणाम होईल आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओवर त्याचा किती परिणाम होईल हे त्यांनी सांगितले नाही. मुकेश अंबानी भारतात येऊ घातलेल्या स्टारलिंकला विरोध करू शकतात, कारण ते ‘रिलायन्स जिओ’चे मालक आहेत, जे भारताच्या टेलिकॉम आणि ब्रॉडबँड मार्केटवर वर्चस्व गाजवतात.

स्टारलिंकला स्पेक्ट्रमचा लिलाव नको

भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. म्हणजेच जगातील सर्वात मोठे ब्रॉडबँड किंवा इंटरनेट मार्केट आहे. यामुळेच या क्षेत्रातील दोन अब्जाधीशांमध्ये ‘ट्रेड वॉर’ सुरू होऊ शकते. पण याला आणखी एक कारण म्हणजे स्टारलिंकचा प्रस्ताव आहे. एलॉन मस्कची कंपनी उपग्रह ब्रॉडबँडसाठी स्पेक्ट्रम लिलाव करू इच्छित नाही, त्याऐवजी फक्त त्यांना परवाना मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे.

हेही वाचाः विश्लेषण : शेअर मार्केटमधून भरमसाठ पैसे कमावताय; ‘डब्बा ट्रेडिंग’मुळे तुमचंही होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या

तर स्टारलिंकला रिलायन्स जिओचा विरोध

स्टारलिंक भारतात येण्यासाठी दीर्घकाळापासून लॉबिंग करीत आहे. ही नैसर्गिक संसाधने आहे म्हणून कंपन्यांना ते वापरण्यासाठी परवाने दिले पाहिजेत, जसे की उर्वरित जगात होत आहे, स्पेक्ट्रम लिलाव भौगोलिक निर्बंध वाढवतात, ज्यामुळे शेवटी खर्च वाढतो, असंही एलॉन मस्क यांचं म्हणणं आहे. तर स्टारलिंकला रिलायन्स जिओचा विरोध आहे. रिलायन्स जिओने जाहीरपणे स्टारलिंकच्या प्रस्तावाशी असहमती व्यक्त केली आहे आणि सरकारला त्यांचा लिलाव करण्यास सांगितले आहे. रिलायन्स जिओचे म्हणणे आहे की, परदेशी उपग्रह सेवा प्रदाते आगामी काळात व्हॉईस आणि डेटा सेवा देऊ शकतात आणि याचा परिणाम पारंपरिक टेलिकॉम कंपन्यांवर होऊ शकतो. त्यामुळे स्पेक्ट्रमचा लिलाव व्हायला हवा. विशेष म्हणजे पुढे काय होईल हे येता काळच ठरवणार आहे. पण एक मात्र नक्की की, या ‘ट्रेड वॉर’चा फायदा ग्राहकांनाच होणार आहे, कारण त्यांच्यासाठी इंटरनेट सेवा आणखी स्वस्तच होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः थरमॅक्सने गुजरातमध्ये उभारला पवन-सौर संमिश्र ऊर्जा प्रकल्प; ‘एवढी’ मेगावॉट वीजनिर्मिती होणार

Story img Loader