पीटीआय, नवी दिल्ली
सोन्याच्या भावाने बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारपेठेत सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ९०० रुपयांनी वधारून ७७ हजार ८५० रुपयांवर पोहोचला. याच वेळी चांदीचा भाव प्रति किलोला ३ हजारांची उसळी घेऊन ९३ हजारांवर गेला.

ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली. सराफांकडून वाढलेली खरेदीही सोन्याच्या भावात वाढ होण्यास कारणीभूत ठरली. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी (ता.२४) प्रति १० ग्रॅमला ७६ हजार ९५० रुपये होता. हा भाव बुधवारी ९०० रुपयांनी वाढून ७७ हजार ८५० रुपयांवर पोहोचला.

वस्तू वायदा बाजार मंच ‘एमसीएक्स’वर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ९९७ रुपये म्हणजेच १.३३ टक्क्याने वाढून ७६ हजार रुपयांवर पोहोचला. याच वेळी चांदीचा भाव प्रतिकिलोला ४१९ रुपये म्हणजेच ०.४५ टक्क्याने वाढून ९१ हजार ९७४ रुपयांवर गेला. जागतिक धातू वायदे मंच ‘कॉमेक्स’वर सोन्याचा भाव प्रतिऔंस २ हजार ६८१ डॉलरवर पोहोचला आहे. ‘कॉमेक्स’वर आज दिवसभरात सोन्याच्या भावाने २ हजार ६९४ डॉलरची उच्चांकी पातळी गाठली होती.

हेही वाचा >>>सेन्सेक्स ८५ हजारांच्या शिखरावरून माघारी

याबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ विश्लेषक मानव मोदी म्हणाले की, सोन्याच्या भावाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्चांकी पातळी गाठली आहे. अमेरिकेतील व्याजदर कपातीबाबत सकारात्मकता कायम असल्याने सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे गुंतवणूकदार आकर्षित होण्याचे प्रमाण वाढत आहे.

नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस ३ हजार २०० डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सोन्याने वायदे बाजारात प्रति १० ग्रॅमला ७६ हजार रुपयांची पातळीही गाठली आहे. आगामी काळात सोन्याच्या भावातील तेजी कायम राहील.- सुरेंद्र मेहता, राष्ट्रीय सचिव, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)