मुंबईः देशातील केवळ ७ टक्के महाविद्यालये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे १०० टक्के उमेदवारांना नोकऱ्या मिळवून देण्यात यशस्वी ठरली असल्याची धक्कादायक बाब एका अहवालातून बुधवारी समोर आली. विद्यार्थ्यांमधील कौशल्याचा अभाव आणि त्यांच्यातील गुणवत्ता हेरण्यात महाविद्यालये कमी पडत असल्याचे कारण यामागे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘अनस्टॉप टॅलेंट २०२४’ या वार्षिक अहवालाने हे निष्कर्ष नोंदविले आहेत. या अहवालानुसार, कौशल्यातील दरी आणि अपुरी तयारी ही ‘कॅम्पस प्लेसमेंट’संबंधाने मुख्य आव्हाने असल्याचे निरीक्षण ६६ टक्के कंपन्या आणि ४२ टक्के विद्यापीठांच्या भागीदार संस्था यांनी नोंदविले आहे. तथापि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवून, नोकरीसाठी त्यांची तयारी करून घेण्यास महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुरेसा सक्षम असल्याचे ९१ टक्के विद्यार्थ्यांना वाटते. मनुष्यबळ सेवेतील ८८ टक्के व्यावसायिकांनी कौशल्याधारित भरती आणि उमेदवाराची क्षमता यांना प्राधान्य दिले जात असल्याचे म्हटले आहे. उमेदवाराचा पूर्वीचा अनुभव, शिक्षण, संदर्भ आणि प्रकल्प यांना फारसे महत्त्व दिले जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा >>>खाद्यवस्तूंच्या चढ्या किंमती रिझर्व्ह बँकेचीही डोकेदुखी
देशभरातील विद्यार्थी, विद्यापीठांच्या सहयोगी संस्था आणि मनुष्यबळ क्षेत्रात कार्यरत व्यावसायिक अशा ११ हजार जणांची मते आजमावणाऱ्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मनुष्यबळ क्षेत्रातील नेतृत्वाशी संवाद साधून त्यांची मतेही त्यात जाणून घेण्यात आली आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांची आकांक्षा, मार्गदर्शन, स्पर्धा यासह इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. नोकर कपातीचे सध्या सुरू असलेल्या वाऱ्याच्या भीतीने ६० टक्के विद्यार्थ्यांनी चांगल्या वेतनमानापेक्षा नोकरीच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी नव्या पिढीच्या स्टार्टअप उपक्रमांकडे पाठ केली जात असून, प्रस्थापित आणि दीर्घ वारसा असलेल्या कंपन्यांत नोकरीला उमेदवार अग्रक्रम देत असल्याचा नवप्रवाहही अहवालाने प्रकाशात आणला आहे.
विद्यार्थी आणि मनुष्यबळ क्षेत्र यांच्या चिंता आणि प्राधान्यक्रम जाणून घेण्यात आले. त्यातून गुणवत्तेचा पुरवठा आणि मागणी यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातून निर्णय क्षमता अधिक सजग होऊन भरती प्रक्रिया प्रभावीपणे होईल, अशी आशा आहे. – अंकित अगरवाल, संस्थापक, अनस्टॉप