पीटीआय, मुंबई
भांडवली बाजार विक्रमी पातळीवर असून या उधाणाबाबत सावधगिरीचा इशारा देताना, या परिस्थितीत गुंतवणुकीस्नेही वातावरण कायम राखण्यास भांडवली बाजार नियामक सेबी आणि सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरण अर्थात सॅट यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी केले. ते मुंबईतील मित्तल कोर्ट येथील सॅटच्या नवीन पीठाचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
चढ्या बाजारात एकंदर सहभागींची संख्या आणि व्यवहारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असते. यातून विवाद वाढण्याची शक्यतादेखील आहे. या वेळी निवाडा करणारा पंच म्हणून ‘सॅट’ची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करून, सरन्यायाधीशांनी नवीन घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आवश्यक त्या सावधगिरीच्या गरजेवर अर्थात पाठीचा कणाही ताठ राहील, हेही पाहिले जावे यावर भर दिला.
हेही वाचा >>>गणेश ग्रीन भारतची शुक्रवारपासून प्रत्येकी १८१ ते १९० रुपयांनी भागविक्री
गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक कायद्याद्वारे संरक्षित असेल आणि तिच्या विवाद निराकरणासाठी प्रभावी यंत्रणा असल्याची खात्री वाटत असल्यास अधिक गुंतवणूक येण्याची शक्यता वाढते. जेव्हा आपण ‘कायद्याचे राज्य’ या कल्पनेचा विचार करतो, तेव्हा अनेकदा त्याचा संबंध केवळ सामाजिक आणि राजकीय न्यायाशी जोडला जातो. मात्र २००५ च्या सुरुवातीस, जागतिक बँकेने, ‘कायद्याचे राज्य’ संरक्षित करणे हे अर्थकारणाशीदेखील निगडित असल्याचा सिद्धांत मांडला. पुरेशी प्रतिबंधात्मक सुरक्षा, निष्पक्षता आणि मनमानी न करता न्याय देणारी मंच या गोष्टी बाजारपेठेमध्ये आणि व्यावसायिक परिसंस्थेमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण करण्यासाठी मोलाच्या ठरतात. गुंतवणुकीच्या ओघामुळे भांडवलनिर्मिती, रोजगार यांसारखे आर्थिक सुपरिणाम दिसून येतात, असे चंद्रचूड म्हणाले.
प्रत्येकाने तोल आणि धीर सांभाळावा
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने ८०,००० अंशांचा मैलाचा दगड ओलांडणे हा एक आनंदाचा क्षण आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड वृत्तपत्रातील मथळ्यांचा हवाला देत म्हणाले. मात्र ही स्थिती ‘स्ट्रॅटोस्फेरिक डोमेन’ अर्थात असामान्य अशा अत्युच्च पातळीत प्रवेश सुचवणारी आहे. अशा नाजूक स्थितीत बाजारावर नियंत्रण ठेवण्याच्या नियामक प्राधिकरणांच्या आवश्यकतेवर त्यांनी जोर दिला. उन्मादाच्या प्रसंगी प्रत्येकाने तोल आणि धीर सांभाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.