मुंबई : वाहन निर्माता कंपन्यांमधील तेजीच्या जोरावर देशांतर्गत भांडवली बाजाराने मंगळवारच्या सत्रात सकारात्मक सुरुवात केली. मात्र दुपारच्या सत्रात बँकिंग आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे बाजार तेजी-मंदीच्या दोलायमान स्थितीत होता.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३७.०८ अंशांनी वधारून ६०,९७८.७५ पातळीवर बंद झाला आणि त्यातील आघाडीच्या ३० समभागांपैकी १५ कंपन्यांचे समभाग तेजी दर्शवित होते. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३०० अंशांची आघाडी घेत ६१,२६६.०६ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
हेही वाचा – जगातील प्रत्येक चौथ्या आयफोनची निर्मिती भारतातून होईल – पीयूष गोयल
मात्र सेन्सेक्समधील निवडक समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे सेसेन्क्स दिवसभरातील उच्चांकीपातळीवरून ४०० अंशांनी घसरून ६०,८४९.१२ या सत्रातील नीचांकी पातळीवर पोहोचला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८,११८.३० पातळीवर स्थिरावला. निफ्टीमधील आघाडीच्या ५० समभागांपैकी २९ समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले.
वाहन निर्माता क्षेत्रातील आघाडीच्या मारुती सुझुकीने सरलेल्या तिमाहीत समाधानकारक आर्थिक कामगिरी नोंदवली. त्यामुळे भांडवली बाजारात वाहन निर्माता कंपन्यांचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने फेडरल रिझर्व्हकडून होणारी आगामी दरवाढ कमी आक्रमक राहण्याच्या आशेने जागतिक बाजारांना चालना दिली. मात्र देशांतर्गत पातळीवर बँकिंग समभागांमध्ये झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीवरील दबाव वाढला, असे निरीक्षण जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
हेही वाचा – बाजारात शुक्रवारपासून ‘टी प्लस १’ व्यवहार प्रणालीचा पूर्णत्वाने अवलंब
सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्सचा समभाग ३.२६ टक्के तेजीत होता. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, एचडीएफसी ट्विन्स, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, टीसीएस आणि आयटीसी या कंपन्यांचे समभाग वधारले. तर दुसरीकडे अॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक , कोटक बँक, टाटा स्टील आणि पॉवर ग्रीड यांच्या समभागात घसरण झाली.
सेन्सेक्स : ६०,९७८.७५ ३७.०८ ( ०.०६)
निफ्टी : १८,११८.३० -०.२५- (०.००)
डॉलर : ८१.७० २८ पैसे
तेल : ८७.५७ -०.७