वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशाच्या सेवा क्षेत्राची वाढ सरलेल्या एप्रिल महिन्यात लक्षणीय उच्चांक नोंदवणारी राहिली. नव्याने आलेला कामांचा ओघ आणि उत्पादन वाढल्याने सेवा क्षेत्राने १३ वर्षांपूर्वीच्या उच्चांकाच्या जवळ जाणारा विस्तार नोंदवल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक एप्रिल महिन्यात ६२ गुणांवर नोंदला गेला. ही निर्देशांकाची जून २०१० नंतरची उच्चांकी पातळी आहे. मार्च महिन्यात तो ५७.८ गुणांवर नोंदला गेला होता. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक ५९.४ गुणांवर नोंदला गेला होता. या निर्देशांकाने नोंदविलेली ती १२ वर्षांतील उच्चांकी पातळी होती.

एप्रिलमध्ये सलग २२ व्या महिन्यात सेवा क्षेत्राची कामगिरी ५० गुणांवर राहिली आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर गुणांक ५० च्या खाली राहिल्यास ते आकुंचनाचा निदर्शक मानला जातो. जरी किमतींच्या आघाडीवर, एप्रिलमध्ये कच्च्या मालासाठी खर्च तीन महिन्यांत सर्वात जलद गतीने वाढला असला तरी, नवीन कामांचा ओघ वाढल्याने नव्या व्यवसायांमध्ये आणि उत्पादन व सक्रियतेत अतिशय जलद गतीने वाढ झाली आहे.

निर्यातीत विस्तार

नव्या व्यवसायांतील वाढ आणि बाजारातील पूरक वातावरण यामुळे सेवा क्षेत्रात वाढ झालेली आहे. पाहणी केलेल्या चार उपक्षेत्रांपैकी वित्त आणि विमा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतीय सेवांना एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. निर्यातीत विस्तार होत असल्याचे हे निदर्शक असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

रोजगार मात्र किरकोळ वाढ

नवीन कामांमध्ये भरीव वाढ होऊनही, सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांच्या आघाडीवर स्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. सेवा क्षेत्रातील मनुष्यबळाची पातळी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या सुरुवातीच्या महिन्यांत किरकोळ वाढ नोंदवू शकली. काही कंपन्यांनी वाढत्या उत्पादन गरजांमुळे मनुष्यबळ वाढविले, तर बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या सध्याच्या गरजांसाठी कर्मचारी संख्या पुरेशी असल्याचे म्हटले आहे.

भारतीय सेवा क्षेत्राची एप्रिलमध्ये चमकदार कामगिरी दिसून आली. कामाचा ओघ वाढल्यामुळे नवीन व्यवसाय आणि उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सेवा क्षेत्राची वाढ १३ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. शिवाय आगामी १२ महिन्यांसाठी अनेक कंपन्यांनी आश्वासक वाढीचा आशावाद व्यक्त केला आहे.- पॉलियाना डी लिमा, अर्थतज्ज्ञ, एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The services sector reported the highest expansion as manufacturing picked up amy