वृत्तसंस्था, सॅनफ्रान्सिस्को
वॉल्ट डिस्ने कंपनीने पुढील आठवड्यात हजारो कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे नियोजन जाहीर केले असून, यात मनोरंजन विभागातील सुमारे १५ टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, असे बुधवारी स्पष्ट करण्यात आले.वॉल्ट डिस्ने कंपनी टीव्ही, चित्रपट, थीम पार्क आणि व्यवस्थापन या विभागातील कर्मचाऱ्यांची कपात ‘डिस्ने’कडून केली जाणार आहे. याबाबत कंपनीकडून २४ एप्रिपासून कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले. याबद्दल कंपनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
डिस्नेने फेब्रुवारी महिन्यांत कर्मचारी कपातीचे संकेत दिले होते. कंपनीने ७ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना असल्याचे म्हटले होते. कंपनीचे एकूण मनुष्यबळ २.२० लाखांच्या घरात असून, वार्षिक खर्चात ५.५ अब्ज डॉलरची बचत करण्याच्या उद्देशाने ही कपात केली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिस्नेच्या मनोरंजन विभागातही कपात केली जाणार आहे. कंपनीच्या चित्रपट व दूरचित्रवाणी निर्मिती आणि वितरण व्यवसायांची पुनर्रचना करून मनोरंजन विभागाची सुरुवात करण्यात आली होती. त्यात स्ट्रिमिंग व्यवसायाचाही समावेश होता.