मुंबई: सुमारे तीन दशकांपूर्वी खासगी विमान कंपन्यांनी आकाशभरारी खुली केली गेल्यापासून, सरासरी एक या दराने दरसाल एक कंपनी या व्यवसायातून बाहेर फेकली गेल्याचे आढळून आले आहे. वाडिया समूहाच्या मालकीची आणि आर्थिक संकटाशी सामना करीत असलेली गो फर्स्ट ही कंपनी यातील ताजी भर ठरेल. गत १७ वर्षांहून अधिक काळ उड्डाण करत असलेल्या या कंपनीने मंगळवारी ऐच्छिक दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला आहे आणि बुधवारपासून तीन दिवसांसाठी तिची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

खासगी विमान कंपन्यांना देशांतर्गत उड्डाणाला १९९४ मध्ये सर्वप्रथम परवानगी देण्यात आली. त्या वर्षापासून, अधिकृत आकडेवारीनुसार किमान २७ अनुसूचित विमानसेवा एकतर बंद करण्यात आल्या किंवा त्यांचे अधिग्रहण किंवा अन्य कंपन्यांमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. ईस्ट वेस्ट ट्रॅव्हल्स अँड ट्रेड लिंक लिमिटेड ही १९९४ मध्ये सुरू झालेली देशातील पहिली खासगी विमान कंपनी होती. जवळपास दोन वर्षांच्या परिचालनानंतर, नोव्हेंबर १९९६ मध्ये तिचे कामकाज बंद पडले. त्याच वर्षी, मोदीलुप्त लिमिटेडनेदेखील गाशा गुंडाळला.

विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडला २०१२ मध्ये उड्डाण थांबवण्यास भाग पाडले गेले. त्यापूर्वी, २००८ मध्ये, किंगफिशर एअरलाइन्सने देशातील वाजवी दरातील हवाई प्रवासाचे प्रणेती डेक्कन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड (एअर डेक्कन) ही कंपनी विकत घेऊन विलीन करून घेतली होती.एअर कार्निव्हल प्रायव्हेट लिमिटेड, एअर पेगासस प्रायव्हेट लिमिटेड, रेलिगेअर एव्हिएशन लिमिटेड, एअर कोस्टा आणि क्विकजेट कार्गो एअरलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड या पाच कंपन्या २०१७ मध्ये नामशेष झाल्या.

डेक्कन कार्गो अँड एक्सप्रेस लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड (२०१४), आर्यन कार्गो एक्सप्रेस (२०११), पॅरामाउंट एअरवेज (२०१०), एमडीएलआर एअरलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड (२००९), जगसन एअरलाइन्स लिमिटेड (२००८) आणि इंडस एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड (२००७) या क्रमाने बंद पडलेल्या विमानसेवा आहेत. १९९६ मध्ये एनईपीसी मायकॉन लि. आणि स्कायलाइन एनईपीसी लि. (पूर्वीची दमानिया एअरवेज लि.) या दोन कंपन्या १९९७ मध्ये बंद पडल्या. अधिकृत नोंदीनुसार, लुप्तान्सा कार्गो इंडिया प्रा. लिमिटेडने २००० सालामध्ये उड्डाणे करणे बंद केले.

एके काळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जेट एअरवेजने एप्रिल २०१९ मध्ये ऑपरेशन्स बंद केले. आर्थिक संकटांमुळे खाईत लोटल्या गेलेल्या या कंपनीला आणि दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेद्वारे यशस्वी बोलीदार निश्चित होऊन मालकी हस्तांतरित केली गेली असली, तरी चार वर्षांहून अधिक काळ बंद पडलेली उड्डाणे तिला अद्याप पुन्हा सुरू करता आलेली नाहीत. त्या आधी, जेट लाइटने (पूर्वाश्रमीची सहारा एअरलाइन्स) २०१९ मध्ये कामकाज बंद केले.

तीन हवाई सेवा – झूम एअर नावाने कार्यरत झालेली झेक्सस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड; डेक्कन चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि एअर ओडिशा एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे कामकाज २०२० मध्ये बंद झाले तर हेरिटेज एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडने २०२२ पासून उड्डाणे बंद केली.