Worlds Richest Families: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे तुम्ही अनेकदा ऐकली असतील. सध्या भारतातील गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यात देशातील नंबर वन श्रीमंत होण्याची शर्यत सुरू आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार नाही. आज आपण अशा कुटुंबांबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याकडे जगातील अफाट संपत्ती आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत जगातील टॉप १० श्रीमंत कुटुंबे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

UAE चे House of Nahyan हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब

ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादी २०२३ नुसार, हाऊस ऑफ नाह्यान हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे कुटुंब प्रथमच या यादीत सामील झाले असून, ते पहिल्या क्रमांकावर आले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३०५ अब्ज डॉलर एवढी आहे. जगातील बहुतांश संपत्ती ही तेलाने बनलेली असल्याचं यादीतून स्पष्ट होते. नाह्यान कुटुंबाच्या जमिनीवर UAE चा सर्वात मोठा तेलाचा साठा सापडला आहे.

वॉल्टन आणि हर्मीस कुटुंबाचा टॉप ३ मध्ये समावेश

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब अमेरिकेचे वॉल्टन कुटुंब आहे. या कुटुंबाने वॉलमार्टमधून आपली संपत्ती कमावली आहे. या कुटुंबाकडे जगातील सर्वात मोठी रिटेल चेन वॉलमार्ट आहे. त्यांची संपत्ती २५९.७ अब्ज डॉलर एवढी होती. तिसर्‍या क्रमांकावर फ्रान्सचे हर्मीस कुटुंब आहे, ज्याची मालमत्ता १५०.९ अब्ज डॉलर आहे. या कुटुंबाकडे लक्झरी फॅशन ब्रँड ‘द हाऊस ऑफ हर्मीस’ आहे.

कतारच्या राजघराण्यातही स्थान निर्माण झाले

अमेरिकन कन्फेक्शनरी कंपनी मार्स चालवणारे मार्स कुटुंब १४१.९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहे. कतारच्या राजघराण्यातील अल थानिसचे घर १३५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहे. तेलाच्या साठ्यांव्यतिरिक्त अल थानिझ कुटुंबाकडे फॅशन लेबल व्हॅलेंटिनो आणि परदेशात अनेक मालमत्ता देखील आहेत.

भारतातील अंबानी कुटुंबही टॉप १० मध्ये आहे

अमेरिकन पेट्रोकेमिकल कंपनी कोच इंडस्ट्रीजचे मालक असलेल्या कोच कुटुंबानेही टॉप टेनच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यांच्याकडे १२७.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. याशिवाय सौदी अरेबियाचे राजघराणे हाऊस ऑफ सौद आहे. त्यांच्याकडे ११२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. यानंतर भारतातील अंबानी कुटुंब देखील ८९.९ अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत सामील झाले आहे. फ्रेंच फॅशन हाऊस चॅनेलचे मालक वेर्थिमर्स कुटुंब ८९.६ अब्ज डॉलर्स आणि रॉयटर्स न्यूजचे मालक थॉम्पसन कुटुंब ७१.१ अब्ज डॉलर संपत्तीसह यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

एका वर्षात २५ कुटुंबांच्या संपत्तीत १.५ ट्रिलियन डॉलर्सची वाढ

ब्लूमबर्गच्या मते, गेल्या एका वर्षात जगातील सर्वात श्रीमंत २५ कुटुंबांच्या संपत्तीत १.५ ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. तसेच या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या आखाती देशांतील तीन राजघराण्यांची संपत्ती अंदाजापेक्षा कितीतरी अधिक आहे. रशियातील आघाडीच्या खाण कंपनी नोरिल्स्क निकेलचे मालक व्लादिमीर पोटॅनिन यांचे कुटुंब ३० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत ४९ व्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These are the richest families in the world possessing immense wealth you will be shocked to hear the riches vrd