World Richest Person : टेस्ला, स्टारलिंक आणि एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा किताब गमावला आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. फ्रेंच उद्योगपती आणि लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट आता पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्स रिअल टाइम अब्जाधीशांच्या मते, बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती सुमारे २०७.६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. एलॉन मस्कची एकूण संपत्ती आता २०४.७ अब्ज डॉलर आहे.
बर्नार्ड अर्नॉल्टने एलॉन मस्कला मागे टाकले
एलॉन मस्क यांना मागे टाकून बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. बर्नार्ड अर्नॉल्टची संपत्ती मस्कच्या संपत्तीपेक्षा ३ अब्ज डॉलर्स जास्त आहे. शुक्रवारी LVMH चे बाजारमूल्य ३८८.८ अब्ज डॉलर पार केले होते. टेस्लाचे बाजारमूल्य सध्या ५८६.१४ अब्ज डॉलर आहे.
हेही वाचाः टाटा आणि एअरबस करणार माऊंट एव्हरेस्टवर उतरणाऱ्या एच १२५ हेलिकॉप्टरची निर्मिती
जाणून घ्या टॉप १० श्रीमंतांची नावे
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि एलॉन मस्क यांच्यानंतर ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे नाव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १८१.३० अब्ज डॉलर्स आहे. लॅरी एलिसनचे नाव चौथ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १४२.२० अब्ज डॉलर्स आहे. १३९.१ अब्ज डॉलर संपत्तीसह मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. यानंतर वॉरन बफेट, लॅरी पेज, बिल गेट्स, सर्जे ब्रिन आणि स्टीव्ह बाल्मर यांच्या नावाचाही जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.
हेही वाचाः ८ लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही का? बजेटमध्ये मिळू शकते आनंदाची बातमी!
अंबानी आणि अदाणी यांची एकूण संपत्ती किती?
आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani Net Worth) यांचे नाव फोर्ब्सच्या रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीत ११ व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १०४.४ अब्ज डॉलर्स आहे. तर भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदाणी (Gautam Adani Net Worth) या यादीत १६ व्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे एकूण ७५.७ बिलियन डॉलर आहेत.