मुंबई: गेल्या काही वर्षांत सहा पटीने वाढ साधत सध्या २४ अब्ज डॉलरवर पोहोचलेली आयुष आयुर्वेद उत्पादने आणि पोषणपूरक (न्युट्रास्युटिकल) उत्पादनांची बाजारपेठ पुढील १० वर्षांत २०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल, असा विश्वास ‘व्हायटाफूड्स इंडिया २०२५’ या तीन दिवसांच्या बी२बी प्रदर्शन व परिषदेच्या मंगळवारी झालेल्या उद्घाटन सत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये हे प्रदर्शन ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सुरू आहे.
सुमारे ५,००० वर्षांचा आयुर्वेदाचा संपन्न वारसा पाहता, भारताने आयुर्वेद व पोषणपूरक नैसर्गिक उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक अग्रणी बनण्याच्या महत्वाकांक्षेने वाटचाल सुरू केली आहे, असे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सचिव डॉ. सुब्रता गुप्ता या प्रसंगी म्हणाले. तथापि या उत्पादनांच्या ५२१ अब्ज डॉलरच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा सध्याचा वाटा नगण्य असून, तो बदलण्यासाठी धोरणकर्ते, उद्योग क्षेत्र, संशोधक आणि उत्पादक शेतकरी या सर्वांनी सुसूत्रता राखत एकसाथ प्रयत्नांची गरज डॉ. गुप्ता यांनी बोलून दाखविली. अश्वगंधा व तत्सम वनौषधींसाठी भौगोलिक संकेत (जीआय) मानांकन मिळवून, त्यासंबंधाने बौद्धिक संपदांचे संरक्षण तसेच भारतीय मानक मंडळाच्या (बीआयएस) माध्यमातून सबंध आयुष क्षेत्राच्या प्रमाणनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ॲग्रो-आयुर्वेद ही संकल्पना पुढे आणून वनौषधींची लागवड आणि इच्छित दर्जा व प्रतवारी मिळविण्यासाठी आयुष विभागाने शेतकऱ्यांशी सहयोगासाठी पुढाकार घेतला आहे.
आयुर्वेद आहार हा न्युट्रास्युटिकल क्षेत्राचा महत्त्वाचा घटक बनेल आणि जागतिक बाजारपेठेत भारताचे ते वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण ठरेल, असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. समीर नेसरी यांनी व्यक्त केला. नाविन्यता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यनिगा ही यंदाच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची मुख्य संकल्पना असून, विदेशातून २५ तर एकूण १६० प्रदर्शकांचे उत्पादन-नाविन्य या निमित्ताने जोखता येईल, असे आयोजक इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास म्हणाले. पोषणपूरक उत्पादनांचे वितरक, पुरवठा व्यवस्थापक, संशोधन व विकास तज्ज्ञ, नियामक व्यवहारांचे व्यावसायिक तसेच उत्पादन विकास तज्ज्ञ आणि नवउद्योजक असे ८,००० हून अधिक नोंदणीकृत प्रतिनिधींकडून तीन दिवसांत उपस्थिती अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.