लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : महागाईची चढती भाजणी, भांडवली बाजारातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीचा अभ्यास करून दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बदलत्या काळानुसार गुंतवणुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये सोने, इक्विटी, म्युच्युअल फंड यासह पारंपरिक गुंतवणुकीची साधने असतात, मात्र ही गुंतवणूक आर्थिक नियोजन आणि उद्दिष्टे निश्चित करून केली आहे का? हे पाहणे गरजेचे आहे, असा कानमंत्र ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या गुंतवणूक जागराच्या कार्यक्रमात वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी यांनी दिला.
प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी यावरून त्याची आर्थिक क्षमता, जोखीम ठरत असते. या जोखमीचा विचार करून गुंतवणूक कशी बदलावी याविषयी अर्थअभ्यासक आणि गुंतवणूक नियोजनकार कौस्तुभ जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अधिक व्याजाच्या मोहापायी चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवून नुकसान करण्यापेक्षा गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून सुरक्षितरीत्या आपले पैसे दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे गुंतवावे, असा सल्ला जोशी यांनी दिला. महागाई आणि गुंतवणुकीची सांगड घालणारे वित्तव्यवस्थापन आवश्यक असून, सुरू असलेली गुंतवणूक काळानुरूप आहे का? त्याचा आढावा घेऊन गुंतवणुकीत बदल करायला हवेत. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जोखीम विभागली जाऊन महागाईवर मात करणारा परतावा मिळण्याची शक्यता असते, असे या कार्यक्रमात आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे स्वप्निल तांबे म्हणाले.
हेही वाचा… एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज समभागांचे ८३ टक्के अधिमूल्यासह बाजारात पदार्पण
हेही वाचा… समभाग व्यवहारात लबाडीचा ‘अदानीं’वर नव्याने आरोप
आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत हा कार्यक्रम ‘महानिर्मिती’च्या वांद्रे (पूर्व) येथील प्रकाशगड मुख्यालयातील सभागृहात पार पडला. या वेळी ‘महानिर्मिती’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी.अनबलगन, बाळासाहेब थिटे (संचालक, वित्त), संजय मारुडकर (संचालक, परिचालन), अभय हरणे (संचालक, प्रकल्प), धनंजय सावळकर (संचालक), कार्यकारी संचालक डॉ. नितीन वाघ, नितीन चांदुरकर, पंकज नागदेवते आणि मुख्य महाव्यवस्थापक आनंद कोंत आणि महानिर्मितीचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी गुंतवणूकदारांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच वक्ते व श्रोते यांच्यात दुवा म्हणून सुनील वालावलकर यांनी भूमिका पार पाडली.