सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांनी परस्पर सहकार्याचा लाभ घेत जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
येत्या १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी निती आयोगातील सदस्यांसह, अर्थतज्ज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी देशातील डिजिटल क्षेत्रातील यशाबद्दल आणि देशभरात नवतंत्रज्ञानावर आधारित वित्त कंपन्यांनी साधलेल्या जलद विस्ताराने आर्थिक समावेशनाला हातभार लावल्याचे नमूद करीत त्यांचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या या बैठकीत शंकर आचार्य, अशोक गुलाटी आणि शमिका रवी यांसारख्या अर्थतज्ज्ञांचा समावेश होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह निती आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी आणि इतर वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
जागतिक पातळीवर सध्या डिजिटायझेशन, ऊर्जा, आरोग्य सेवा आणि कृषी यांसारख्या क्षेत्रात नवीन आणि वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध आहेत. या संधी सध्याचे बाह्य प्रतिकूल वातावरणात पाहता आपल्याला हेरता येण्यासारख्या आहेत. त्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्राने एकत्रित प्रयत्न करावेत, असे पंतप्रधानांनी आवाहन केले. नारी शक्तीच्या भारताच्या विकासामधील योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांचा सहभाग अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.