मुंबई : प्रतिकूल हवामान टोमॅटोचे उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरले असून, टोमॅटोच्या किमतीने आता पेट्रोल आणि डिझेलला मागे टाकले आहे. देशभरात टोमॅटोच्या भावातील वाढ कायम असून, यंदा त्यात तब्बल साडेचार पट (४४५ टक्के) वाढ नोंदविण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे उत्पादन कमी झाल्याने जून आणि जुलै महिन्यात टोमॅटोचे भाव वाढतात. यंदाची भाववाढ मात्र आभाळाला पोहोचली आहे. मागील महिन्यात देशात टोमॅटोचे उत्पादन होणाऱ्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान होते. याच वेळी काही भागांत मुसळधार पाऊस झाला. या विचित्र स्थितीचा टोमॅटोच्या पिकाला फटका बसला आणि परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> चांगली बातमी! रेल्वे प्रवास आता स्वस्त होणार, एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात

टोमॅटोचा भाव मुंबईत जानेवारी महिन्यात प्रति किलो २५ ते ३० रुपये होता. आता तो प्रति किलो १४० रुपयांवर पोहोचला आहे. याच वेळी मुंबईत पेट्रोलचा दर हा प्रतिलिटर १११.३५ रुपये आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलला मागे टाकत टोमॅटोने महागाईचा कळस गाठला आहे. यावरून केंद्रातील भाजप सरकारला समाजमाध्यमातून लक्ष्य केले जात आहे.

मॅकडोनाल्ड्सची टोमॅटोवर फुली

मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या उपाहारगृहांनी बर्गरमध्ये टोमॅटोचा वापर बंद केला आहे. कंपनीने दिल्लीतील उपाहारगृहांबाहेर चिकटवलेल्या सूचना पत्रकात टॉमेटोच्या तात्पुरत्या तुटवड्याबद्दल ग्राहकांना सूचित केले आहे. ‘टोमॅटोचा पुरवठा कमी झालेला असून, बाजारात उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या खाद्यपदार्थांमध्ये सध्या टोमॅटोचा वापर थांबविला आहे. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत,’ असे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा >>> सहकार क्षेत्रात खासगी भागीदारी हवी, सतराव्या भारतीय सहकार संमेलनात मुद्दा ऐरणीवर

भाववाढीचे अर्थ-राजकारण

० टोमॅटो आणि कांदा ही दोन पिके देशातील सामान्य नागरिकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

० या दोन जिनसांचा वापर दैनंदिन स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचे भाव वाढल्याची जनमानसांत लगेचच प्रतिक्रिया दिसून येते.

० या भाववाढीचा अनेक पक्षांना निवडणुकांमध्ये फटका बसल्याचेही याआधी घडले आहे. ० भाज्यांचे भाव वाढल्यास रिझर्व्ह बँकेच्या महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनांवर परिणाम होतो.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomato prices breach petrol rates tomatoes more expensive than petrol print eco news zws
Show comments