मुंबई: जगावरील युद्धजन्य अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल, धातू आणि अन्य महत्त्वाच्या जिनसांचा किंमतीतील भडका आणि देशांतर्गत महागाईचा चढत असलेला पारा अशा अस्थिर स्थितीत यंदाचा अर्थसंकल्प मांडला गेला. त्यातील तरतुदींचे गुंतवणुकीवरील परिणामांबाबत जनसामान्यांत उत्सुकता स्वाभाविकच असून, त्याचीच तपशीलवार माहिती देणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन आणि त्या निमित्ताने गुंतवणुकीचा जागर (उद्या) शनिवारी सायंकाळी दादरमध्ये होत आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रायोजित तसेच लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. आणि जमीन प्रा. लि. सह-प्रायोजक असलेला ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ हा गुंतवणूकदार मार्गदर्शनपर उपक्रम शनिवार, २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, कोहिनूर हॉल, दुसरा मजला, स्वामी नारायण मंदिरासमोर, दादर (पूर्व) येथे होत आहे. या विनामूल्य आणि सर्वांसाठी खुल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुंतवणूकदारांना सहभागी तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या मनांतील प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अर्थब्रह्म या विशेषांकाच्या प्रकाशनाचे यंदाचे हे सलग दहावे वर्ष आहे.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धडकी भरवणारे अनुभव सध्या येत आहेत. मात्र, देशाची सध्याची आर्थिक स्थिती आणि अर्थसंकल्पाने धोरणांना दिलेली दिशा पाहता विकासाच्या क्षेत्रातील उत्तम कंपन्यांचे समभाग निवडून दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण आखता येऊ शकते. अशाच अर्थसंकल्पोत्तर शेअर खरेदीबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक व स्तंभलेखक अजय वाळिंबे हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुचविल्याप्रमाणे नवीन प्राप्तिकर प्रणाली स्वीकारावी की पारंपरिक करबचतीसाठी गुंतवणुकीची जुनीच प्रणाली बरी याचे उत्तरही या निमित्ताने करसल्लागार आणि वरिष्ठ सनदी लेखापाल प्रवीण देशपांडे हे देतील. वैयक्तिक आणि कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करताना, दीर्घ मुदतीचे आर्थिक नियोजन गरजेचे आहे. या नियोजनांत बँक एफडी ते शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने, स्थावर मालमत्ता अशा वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या प्रकारातील लाभ आणि जोखमीचे तिढे सोडवणेही क्रमप्राप्त ठरते. हीच गोष्ट सेबी नोंदणीकृत वित्तीय नियोजनकार तृप्ती राणे सुलभ करून सांगतील.
गुंतवणुकीचा गुणाकारः ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’
कधी : शनिवार, २५ फेब्रुवारी २०२३
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
वक्ते (विषय):
अजय वाळिंबे (अर्थसंकल्पानंतरची शेअर खरेदी)
प्रवीण देशपांडे (कर नियोजन महत्त्वाचेच)
तृप्ती राणे (‘ॲसेट अलोकेशन’मधून गुंतवणूक वैविध्य)
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.