वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जागतिक पातळीवरील मंदीसदृश परिस्थिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अॅमेझॉन, गूगलसारख्या महाकाय कंपन्यांकडून नोकर कपात करण्यात येत आहे. जागतिक पातळीवर सुरू झालेल्या या नोकरकपातीच्या साथीमुळे जानेवारी महिन्यात आतापर्यंत सरासरी १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात आहे.
संभाव्य मंदीच्या भीतीने आणि आगामी काळात बाजारात टिकून राहण्यासाठी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर खर्चात कपात केली जात असल्याने २०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात दररोज सरासरी १,६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावे लागणार आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये दररोज सरासरी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. एकूण १,५४,३३६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, अशी माहिती नोकरी कपातीचा अभ्यास करणाऱ्या लेऑफ.एफवायआय या संकेतस्थळाने दिली आहे.
सरलेल्या वर्षात देशामध्ये मुख्यतः तंत्रज्ञान क्षेत्र आणि नवउद्यमी (स्टार्टअप) क्षेत्राकडून सर्वाधिक नोकर कपात करण्यात आली. देशांतर्गत समाजमाध्यम कंपनी शेअरचॅटने (मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड) बाजारातील अनिश्चिततेच्या परिस्थितीमुळे २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. ज्याचा पाचशेहून अधिक कर्मचार्यांना फटका बसला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये, शेअरचॅटने त्यांच्या जीत११ नावाचा खेळांची संबंधित आभासी मंचाचे कामकाज बंद केल्यानंतर ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मोबाइल ॲपआधारित आरक्षित केल्या जाणाऱ्या ओला या टॅक्सी सेवा कंपनीने २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आणि आवाजाशी संबंधित नवउद्यमी (व्हॉईस ऑटोमेटेड स्टार्टअप) स्किट.एआय सारख्या कंपन्यांनीही या महिन्यात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तर मोबाइल ॲपआधारित वाण सामान आणि इतर वस्तूंची घरपोच करणाऱ्या डन्झोने खर्चात कपात करण्यासाठी ३ टक्के कर्मचारी काढून टाकले आहेत.
विद्यमान वर्ष २०२३ ची सुरुवात तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी निराशाजनक ठरली आहे. ९१ कंपन्यांनी या महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत २४,००० हून अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे. ज्यामुळे आगामी काळ अधिक चिंताजनक राहणाचे संकेत मिळत आहेत. अॅमेझॉनने जागतिक स्तरावर १८,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे, ज्यात भारतातील सुमारे १,००० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लिंक्डइनची चलती
व्यावसायिक जनसंपर्क तसेच भेटीगाठींसाठी अस्तित्वात असणारी लिंक्डइन या संकेतस्थळावरून मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. सेन्सर टॉवर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, सरलेल्या वर्षात, म्हणजेच २०२२ मध्ये ५.८४ कोटीवेळा लिंक्डइन डाउनलोड करण्यात आले.