मुंबई : आघाडीच्या ५०० कंपन्यांच्या समभागांमध्ये समभाग खरेदी-विक्रीची व्यवहारपूर्तता एका दिवसात (सेटलमेंट) पूर्ण करणाऱ्या नव्या ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणालीची अंमलबजावणी येत्या ३१ डिसेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती भांडवली बाजार नियामक सेबीने मंगळवारी दिली. टप्प्याटप्प्याने ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणालीचा विस्तार केला जाणार आहे.
सेबीने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत बाजारभांडवलाच्या दृष्टीने आघाडीच्या ५०० कंपन्यामध्ये पर्यायी ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. सर्व शेअर दलालांना (स्टॉक ब्रोकर्स) ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणालीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय ‘टी प्लस शून्य’ आणि ‘टी प्लस एक’ व्यवहार प्रणालीसाठी वेगवेगळे ब्रोकरेज अर्थात दलाली शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा : देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने सप्टेंबर महिन्यात ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतला होता. त्यावेळी निर्णयामागील कारण बाजारमंचाने स्पष्ट केले नव्हते.