मुंबई : भांडवली बाजारातील दहा आघाडीच्या कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल गेल्या आठवड्यात १.९७ लाख कोटी रुपयांनी घसरले. यामध्ये टाटा समूहातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि तिची प्रतिस्पर्धी कंपनी इन्फोसिसला सर्वाधिक झळ बसली. गेल्या आठवड्यातील अस्थिर वातावरणामुळे निर्देशांकात सर्वाधिक योगदान देणाऱ्या कंपन्यांच्या किमतीमध्ये सर्वाधिक घसरण झाली.
टीसीएसचे बाजार मूल्य १.१० लाख कोटी घसरून १४.१५ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. त्यापाठोपाठ इन्फोसिसचे बाजारभांडवल ५२,००० कोटी रुपयांनी घसरून ६.२६ लाख कोटी रुपये झाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲसेंचरने आर्थिक वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा महसूल अंदाज घटवल्याने शुक्रवारी सत्रात देशांतर्गत भांडवली बाजारात आयटी कंपन्यांचे समभाग घसरले. त्यापाठोपाठ हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य १६,८३४ कोटी रुपयांनी घसरून ५.३० कोटी रुपयांपर्यंत खाली आले आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अर्थात एलआयसीचे बाजारमूल्य सुमारे ११,७०१ कोटी रुपयांनी घसरून ५.७३ कोटी रुपयांवर आले. एचडीएफसी बँकेच्या बाजारभांडवलात ६,९९६ कोटींची घट झाली आणि ते १०.९६ लाख कोटी रुपये झाले.
हेही वाचा…‘एसएमई आयपीओं’च्या मंचावर विक्रमी ५,५७९ कोटींची निधी उभारणी
कोणत्या कंपन्यांच्या बाजारभांडवलात वाढ?
बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभांडवल मात्र सरलेल्या आठवड्यात ४९,१५२ कोटींनी वाढून १९.६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. त्यापाठोपाठ सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात बँक असलेल्या स्टेट बँकेच्या बाजारभांडवलात १२,८४५ कोटी रुपयांची भर पडली, तिचे बाजारभांडवल ६.६६ लाख कोटींवर पोहोचले आहे. त्यापाठोपाठ आयटीसीचे बाजारभांडवल ५.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून त्यात ११,१०८ कोटी रुपयांची भर पडली. भारती एअरटेलचा ९,४३० कोटी रुपयांनी वाढून ६.९८ लाख कोटी पोहोचले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या बाजारभांडवलाने ७.६५ लाख कोटी रुपयांवर झेप घेतली असून त्यात ८,१९१ कोटी रुपयांची भर पडली. सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांच्या क्रमवारीत, रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रथम क्रमांक कायम राखला असून त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक, इन्फोसिस, एलआयसी, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचा क्रमांक लागतो.