छत्रपती संभाजीनगर: टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) कंपनीला छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन उत्पादन प्रकल्पासाठी ८२७ एकर जागा सरकारकडून देण्यात आली आहे. या प्रकल्पावर कंपनी २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी सोमवारी दिली.

इलेक्ट्रिक आणि हायब्रीड मोटारींच्या निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याचा टीकेएमने राज्य सरकारसोबत ३१ जुलैला करार केला होता. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त भागीदारीतून नवीन स्मार्ट औद्योगिक शहर वसविले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (एमआयटीएल) ही विशेष उद्देश कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे. या क्षेत्रांत प्रकल्प-गुंतवणूक येऊ लागली असून, यातील बिडकीनमधील ८२७ एकर जागा सोमवारी टीकेएमला वितरित करण्यात आली.

हेही वाचा : चिनी अर्थव्यवस्थेची उभारी भारताच्या शेअर बाजाराच्या मूळावर; सलग सहा सत्रातील घसरणीत ४०,००० कोटींच्या गुंतवणुकीचे चीनकडे वळण

टीकेएम या ठिकाणी तब्बल २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, प्रकल्प उभारणीचे काम तातडीने सुरू होत आहे. प्रकल्पातून जानेवारी २०२६ पासून उत्पादन सुरू होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष ८ हजार रोजगार आणि अप्रत्यक्ष १८ हजार रोजगार निर्माण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : भारत-यूएई २०० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीतून ‘फूड कॉरिडॉर’ उभारणार – पीयूष गोयल

दरवर्षी ४ लाख मोटारींचे उत्पादन

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीसोबत राज्य सरकारने करार केला, त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, कंपनीने या ठिकाणी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक योजली आहे. या प्रकल्पातून दरवर्षी ४ लाख इलेक्ट्रिक आणि हायब्रीड मोटारींचे उत्पादन होईल. या प्रकल्पामुळे वाहन निर्मिती क्षेत्रात क्रांतिकारी बदल होतील.