पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयातीतील मोठ्या घसरणीमुळे भारताची व्यापार तूट सप्टेंबरमध्ये १९.३७ अब्ज डॉलर अशा पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली, ज्यामुळे मागील वर्षीच्या याच कालावधीत २७.९८ अब्ज डॉलर पातळीच्या तुलनेत त्यात ३० टक्क्यांहून अधिक घसरण झाली, असे वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

दुसरीकडे जागतिक पातळीवरील नकारात्मक घडामोडींमुळे आणि भारताच्या निर्यात बाजारपेठा असलेल्या देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असल्याने निर्यातीच्या आघाडीवरही घसरण क्रम सुरू आहे. सरलेल्या सप्टेंबर महिन्यात निर्यातीतही देशाची पीछेहाट झाली असून ती २.६ टक्क्यांनी घसरून ३४.४७ अब्ज डॉलरवर सीमित राहिली असल्याचे अधिकृत आकडेवारी दर्शवते. गेल्यावर्षी याच महिन्यात (सप्टेंबर २०२२) ती ३५.३६ अब्ज डॉलर नोंदवण्यात आली होती.

हेही वाचा… आघाडीच्या आयटी कंपन्यांतील मनुष्यबळात घट; टीसीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेकमध्ये नवीन भरती कमी

वाणिज्य मंत्रालयाने सप्टेंबरसाठी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतील दिलासादायक बाब म्हणजे, आयात १५ टक्क्यांनी घसरून ५३.८४ अब्ज डॉलर झाली. ती तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये नोंदवलेल्या ती ६३.३७ अब्ज डॉलरवर राहिली होती. परिणामी, सप्टेंबर २०२३ मध्ये देशाची व्यापार तूट १९.३७ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली आहे.

किंमत स्थिरतेने आयातमूल्य घटले

वस्तू आणि सेवांच्या किमतीतील घट आणि काही वस्तूंच्या किमती स्थिर राहिल्याने त्याची परिणती एकंदर आयात मूल्य कमी होण्यात झाली आहे. गेल्या वर्षी, रशिया-युक्रेन संघर्षामुळे, सोया तेल, पेट्रोलियम उत्पादने, लोखंड आणि पोलाद यासह अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या, ज्या आता लक्षणीयरीत्या खाली आल्या आहेत. त्यामुळेदेखील आयात मूल्य कमी झाले आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले. शिवाय केंद्र सरकारच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेमुळे उद्योगांच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे भारताला स्वावलंबी बनण्यास आणि आयात वस्तूंचा पर्याय सक्षम बनवण्यास मदत झाली आहे, असे केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले.

हेही वाचा… Gold-Silver Price on 14 October 2023: ऐन सणवारात ग्राहकांना महागाईच्या झळा! सोन्या-चांदीची उच्चांकाकडे धाव, पाहा आजचा भाव

एप्रिल ते सप्टेंबर या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत निर्यात ८.७७ टक्क्यांनी घसरून २११.४ अब्ज डॉलर झाली आहे. तर या सहा महिन्यांच्या कालावधीत आयात १२.२३ टक्क्यांनी घसरून ३२६.९८ अब्ज झाली आहे. व्यापार तूट म्हणजेच आयात आणि निर्यातील तफावत या कालावधीत ११५.५८ अब्ज डॉलर नोंदण्यात आली.

नवीन बाजारपेठांचा शोध

अमेरिका, चीन, बांगलादेश आणि सिंगापूर यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमधील भारतीय वस्तूंच्या मागणीत अलीकडच्या काही महिन्यांत लक्षणीय घट झाली आहे. घसरत चाललेली निर्यात कमी करण्यासाठी नवीन बाजारपेठांचा शोध घेतला जात आहे. तसेच काही नवीन बाजारपेठांमधील भारताची कामगिरी उंचावणारी आहे. तसेच भारत आणि ब्रिटनदरम्यान मुक्त व्यापार करारासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. मुक्त व्यापारासंदर्भात असलेल्या काही मतभेदांवर चर्चा सुरू असून लवकर तो प्रत्यक्षात येईल, असेही बर्थवाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trade deficit of country falled in the month of september print eco news asj
Show comments