लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: अमेरिकेने अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याला ९० दिवसांची स्थगिती दिल्याचे देशांतर्गत भांडवली बाजारात शुक्रवारी उत्साही प्रतिबिंब उमटले. गुंतवणूकदारांनी बँकिंग, तेल आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स १,३१० अंशांनी वधारून ७५ हजारांपुढे, तर निफ्टीने २२,९०० पुढे मजल मारली.
जागतिक भांडवली बाजारांतील नरमाईचा कल झुगारून, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,३१०.११ अंशांनी म्हणजेच १.७७ टक्क्यांनी वधारून ७५,१५७.२६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,६२०.१८ अंशांची भर घालत ७५,४६७.३३ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ४२९.४० अंशांची म्हणजेच १.९२ टक्क्यांची कमाई केली आणि तो २२,८२८.५५ पातळीवर बंद झाला.
व्हाईट हाऊसच्या आदेशांनुसार, अमेरिकेने भारतावरील अतिरिक्त कर आकरण्यास ९० दिवसांची म्हणजेच ९ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. २ एप्रिल रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला वस्तू निर्यात करणाऱ्या सुमारे ६० देशांवर अतिरिक्त व्यापार शुल्क लादण्याची घोषणा करताना, भारतावर २६ टक्के अतिरिक्त करवाढ लादली होती. ज्याचा विपरित परिणाम कोळंबीपासून पोलादापर्यंतच्या उत्पादनांच्या विक्रीवर दिसून आला असता. तूर्त हे संकट टळले असले तरी चीन आणि अमेरिकेतील ‘जशास-तसे’ धाटणीच्या व्यापार युद्धाच्या वाढत्या चिंतेमुळे जागतिक भांडवली बाजाराला घसरणीने घेरल्याचे शुक्रवारी दिसून आले. गुरुवारी महावीर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटीमुळे भारताच्या शेअर बाजारातील व्यवहार बंद होते.
अनिश्चिततेच्या काळात अमेरिकेने वाढीव शुल्काला अनपेक्षित विराम दिल्याने दिलासा मिळाला. आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनी टीसीएसच्या निकालाने मात्र निराशा केली आहे. मात्र कार्यादेशातील वाढीमुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या उत्तरार्धात कामगिरीत सुधारणा होण्याचा आशावाद आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचा समभाग ४.९१ टक्क्यांनी वधारला. कंपनीने कार्यक्षमता आणि नफाक्षमता सुधारण्यासाठी तिच्या नेदरलँड्सस्थित प्रकल्पात नोकर कपातीसह संरचनात्मक परिवर्तन योजना जाहीर केल्यानंतर समभागात ही वाढ झाली. त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, कोटक महिंद्र बँक, एनटीपीसी आणि अदानी पोर्ट्स यांचा समावेश वधारलेल्यांमध्ये राहिला.
येत्या आठवड्यात दोन दिवस व्यवहार बंद
येत्या आठवड्यात सोमवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजारातील समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. तर शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त सुटी असल्याने व्यवहार बंद राहतील. त्यामुळे आगामी आठवड्यात पाचऐवजी तीनच दिवस शेअर बाजारात व्यवहार सुरू असतील.
सेन्सेक्स ७५,१५७.२६ १,३१०.११ १.७७%
निफ्टी २२,८२८.५५ ४२९.४० १.९२%
तेल ६३.५३ ०.३२
डॉलर ८६.०७ -६१ पैसे