मुंबई: ग्राहकांच्या गरज आणि मागणीनुरूप कार्यालयीन फर्निचर निर्मितीतील बंगळूरुस्थित कंपनी ट्रान्सस्टील सीटिंग टेक्नॉलॉजीजने ‘एनएसई इमर्ज’ या विशेष बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी प्रारंभिक समभाग विक्री प्रस्तावित केली असून, त्यायोगे ४९.९८ कोटी रुपये उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये इन्फोसिस, आयटीसी, बॉश, वोल्व्हो, अमेरिकन एक्स्प्रेस, टायटन आदींचा समावेश आहे.
हेही वाचा >>> भांडवली बाजार पाच वर्षांत दुपटीने वाढणार; मोतीलाल ओसवालचे सहसंस्थापक अगरवाल यांचा अंदाज
बुधवार, १ नोव्हेंबर हा भागविक्रीचा शेवटचा दिवस असून, इच्छुकांना प्रति समभाग ७० रुपये याप्रमाणे बोली लावता येईल. भागविक्रीपूर्व कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १३ कोटी रुपये उभारले आहेत. ग्रेटेक्स आणि पँटोमॅथ समूह हे या भागविक्रीचे प्रधान व्यवस्थापक आहेत. भागविक्रीतून मिळणाऱ्या निधीपैकी १४.८९ भांडवली विस्तारासाठी गुंतवणूक, २० कोटी रुपये हे खेळते भांडवल म्हणून आणि ६.६५ कोटी रुपये हे कंपनीवरील कर्जाच्या परतफेडीसाठी वापरात येणार आहे.