मुंबई : अमेरिकेने चीनवर लादलेल्या नवीन व्यापार करामुळे जागतिक भांडवली बाजारातील घसरणीचे प्रतिकूल पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावरही बुधवारी उमटले. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग दुसऱ्यांदा कपात करूनही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीतून सावरू शकले नाहीत.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३७९.९३ अंशांनी (०.५१ टक्के) घसरून ७३,८४७.१५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५५४.०२ अंश गमावत ७३,६७३.०६ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १३६.७० अंशांची घसरण (०.६१ टक्के) झाली आणि तो २२,३९९.१५ पातळीवर बंद झाला.

आशियाई शेअर बाजारातील कमकुवत कलाचे सावट देशांतर्गत बाजारावरही दिसून आले. अमेरिकेने चिनी आयातीवर १०४ टक्के कर लादल्याच्या वृत्ताने बाजारात मोठी घसरण झाली. एकंदर व्यापार युद्धाच्या गंभीर शक्यतेने जागतिक जोखीम वाढली आहे. त्या परिणामी बाजारपेठांमध्ये विक्रीचा दबाव पुन्हा दिसून आला. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने, रेपो दर कपात आणि अनुकूल धोरणात्मक भूमिका घेत रचनात्मक पाऊल टाकले. तथापि जागतिक मंदीचा धोका कायम असल्याने बाजारावरील निराशेचे मळभ कायम राहिले, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्टेट बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ टेक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, सन फार्मा, इन्फोसिस, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एनटीपीसीचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. तर नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसीचे समभाग मात्र तेजीत होते.

सेन्सेक्स ७३,८४७.१५ -३७९.९३ -०.५१ %

निफ्टी २२,३९९.१५ -१३६.७० -०.६१ %

तेल ६०.१६ -४.२३ %

डॉलर ८६.७१ ४५