पुणे : कॉसमॉस बँकेत मुंबईतील दि साहेबराव देशमुख सहकारी बँक आणि मराठा सहकारी बँक (सुधारित योजना) या दोन सहकारी बँकांचे विलीनीकरण होणार आहे. या विलीनीकरणास कॉसमॉस बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये शुक्रवारी सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सभेत विलीनीकरणाबाबतची भूमिका मांडताना बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे म्हणाले की, नजीकच्या काळात कॉसमॉस बँकेचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे. मुंबईस्थित या दोन बँकांच्या विलीनीकरणामुळे कॉसमॉसचा विस्तार मुंबईमध्ये मोठया प्रमाणात होणार आहे. दि साहेबराव देशमुख सहकारी बँकेच्या ११ शाखा असून २४४ कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे मराठा सहकारी बँकेच्या सात शाखा असून एकूण व्यवसाय १६२ कोटी रुपयांचा आहे. आतापर्यंत कॉसमॉस बँकेने १६ इतर लहान सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे.

बँकेतर्फे विलीनीकरणाचा प्रस्ताव लवकरच रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. या सभेस बँकेचे उपाध्यक्ष सचिन आपटे, संचालक मंडळातील सर्व सदस्य व व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two co operative banks merged into cosmos bank asj