मुंबईः इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाशी झुंजत असलेल्या खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत कठपालिया आणि सह-मुख्याधिकारी अरुण खुराणा अशा दोन सर्वोच्च अधिकारपदावरील व्यक्तींनी, बँकेतील ताज्या संकटाचा बोभाटा होण्यापूर्वी गेल्या काही काळात त्यांच्याकडील बहुतांश समभागांची विक्री केल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते.

मुंबई शेअर बाजाराद्वारे उपलब्ध इनसायडर ट्रेडिंग विदा असे दर्शविते की, सुमंत कठपालिया यांनी २४ मे २०२३ ते २५ जून २०२४ या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक मालकीचे बँकेचे तब्बल साडे नऊ लाख समभाग विकून १३४ कोटी रुपये कमावले आहेत. या काळादरम्यान त्यांनी ३४ कोटी रुपये मूल्याचे बँकेचे ३,९६,००० समभाग खरेदी देखील केले. त्याचवेळी खुराणा यांनी याच काळादरम्यान त्यांच्या वैयक्तिक मालकीचे बँकेचे साडेपाच लाख समभाग विकून ८२ कोटी रुपये मिळविले आहेत. खुराणा यांनी या काळात समभाग खरेदीही केली, पण तिचे मूल्य २५ कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे.

या दोन्ही उच्चाधिकाऱ्यांनी कर्मचारी समभाग स्वामित्व योजनेअंतर्गत (ईसॉप) मिळविलेले समभाग विकले आणि ते त्यांनी अर्थातच सवलतीच्या दरात मिळविले असावेत. शिवाय त्यांनी जवळपास ८० टक्क्यांच्या घरात जाणारी त्यांच्या हिश्शातील समभाग विक्री केल्याचेही सूचित होते. तथापि इंडसइंड बँकेने या संबंधाने स्पष्टतेसाठी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. समभागांचे मूल्य सर्वोच्च स्तरावर असतानाच विक्री झाली असल्याने देखील या संबंधाने संशयाला जागा निर्माण झाली आहे.

चार दिवसांपूर्वी १० मार्चला इंडसइंड बँकेने तिच्या डेरिव्हेटिव्ह सौद्यांच्या हिशेबात विसंगती आढळल्याचा शेअर बाजारांना सूचित करणारा उलगडा केला. बँकेच्या विदेशी चलनांतील व्यवहाराशी संबंधित हिशेबी चूक झाल्याच्या या खुलाशातून बँकेचा तोटा साधारण २,१०० कोटी रुपयांच्या घरात जाणारा असल्याचे अंतर्गत छाननीतून आढळल्याचे बँकेने म्हटले आहे. या सौद्यांसाठी झालेला खर्च बँकेकडून कमी लेखला गेल्याचे आणि ही बाब सप्टेंबर २०२४ मध्ये लक्षात आल्याचे बँकेकडून सांगितले गेले. नेमके त्या आधीच उच्चाधिकाऱ्यांकडून समभाग विक्रीदेखील झाल्याचे आता धक्कादायकरित्या स्पष्ट होत आहे.

इंडसइंड बँकेच्या समभागाचे मूल्य १,५७३ रुपयांच्या उच्चांकापासून, निम्म्याहून अधिक ऱ्हास पावत गुरुवारी शेअर बाजारात ६७२ रुपयांवर स्थिरावले होते. म्हणजेच ते आता करोनापूर्व नोव्हेंबर २०२० च्या पातळीवर रोडावले आहे. मंगळवारच्या सत्रात तर त्याने इतिहासातील सर्वोच्च २७ टक्क्यांची आपटी नोंदवली आहे.