शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असलेल्या ‘अनॲकॅडमी’ने ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यांनतर, खर्चात कपातीसाठी नवीन पाऊल म्हणून, संस्थापकांसह वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातीचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. वेतनकपात ही सध्या असलेले कर्मचाऱ्याचे वेतन, कामाची व्याप्ती आणि कामगिरी यावर अवलंबून असेल, असे कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मुंजाल यांनी सर्व कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्क्यांपर्यंत कपात केली जाऊ शकते. ही कपात कायमस्वरूपी असून एप्रिल २०२४ मध्ये या संबंधाने फेरआढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे मुंजाल यांनी सांगितले.
‘अनॲकॅडमी’ने गुरुवारी मनुष्यबळात १२ टक्क्यांची कपात जाहीर केली आणि यातून सुमारे ३८० कर्मचाऱ्यांना नारळ दिला गेला. कंपनीकडून करण्यात आलेली ही चौथी कर्मचारी कपात आहे. जपानच्या ‘सॉफ्टबँके’चे आर्थिक पाठबळ लाभलेल्या नवउद्यमी उपक्रमांमध्ये ‘अनॲकॅडमी’चा समावेश होतो.