नवी दिल्ली : भारत-जपान अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) पुरवठा साखळी भागीदारीसंदर्भातील सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि जपानच्या अर्थव्यवस्था, व्यापार व उद्योग मंत्रालय यांच्यातील सहकार्य कराराची माहिती देण्यात आली. उद्योग आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी सेमीकंडक्टरचे महत्त्व ओळखून सेमीकंडक्टर पुरवठा साखळी वाढवण्यासाठी भारत आणि जपानमधील सहकार्य बळकट करणे हा कराराचा उद्देश आहे. या सहकार्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षरी झाल्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. हा करार पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.
या कराराच्या माध्यमातून अत्याधुनिक लवचीक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी सुरू करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य केले जाणार आहे. या करारामध्ये सुधारित सहकार्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.