लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : भांडवली बाजाराविषयी नजीकच्या काळातील दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या आणि गुंतवणुकीसंबंधाने निर्णय घेण्यास सामान्य गुंतवणूकदारांना मदतकारक ठरणाऱ्या ‘रास्त मूल्य मानदंडा’चे युनियन म्युच्युअल फंडाने शुक्रवारी अनावरण केले. फंड घराण्याकडून माग घेतल्या जात असलेल्या १७३ समभागांवर आधारित आणि निफ्टी ५० निर्देशांकावर बेतलेले हे साधन दरमहा अद्ययावत रूपात प्रसिद्ध केले जाणार आहे.
त्या त्या काळातील परिस्थिती आणि मूल्यांकनानुसार समभाग बाजाराविषयी बाळगावयाचे पाच प्रकारचे दृष्टिकोन पाच वर्णपंक्तीद्वारे या साधनांतून दर्शविले जाते. अत्यंत आकर्षक, रास्त मुल्यांकन, माफक मुल्यांकन आणि महागडे मुल्यांकन असे बाजाराचे पाच टप्पे वेगवेगळ्या पाच रंगांत दर्शविले गेल्याने गुंतवणूकदारांना त्याचे आकलनही सहजपणे होईल, असे युनियन म्युच्युअल फंडाचे नवनियुक्त मुख्य गुंतवणूक अधिकारी हर्षद पटवर्धन यांनी सांगितले. सध्याचा बाजाराचा टप्पा हा रास्त मुल्यांकनाचा असून, पुढील तीन ते सहा महिने गुंतवणुकदारांनी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचे धोरण अनुसरण्याची शिफारस या नवीन साधनाच्या आधाराने पटवर्धन यांनी केली.
हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत तोकड्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवेवर परिणाम
हेही वाचा – मुंबई: चेंबूरमध्ये मोटारगाडीची विजेच्या खांबाला धडक, दोन महिलांसह पाचजण जखमी
मागील १० वर्षे कालावधीतील बाजाराच्या वर्तनाचे विश्लेषण केल्यास, साधारण ४५ टक्के प्रसंगी बाजार रास्त मुल्यांकन क्षेत्रात राहिला आहे. तर आकर्षक मुल्यांकन आणि माफक महागडे मुल्यांकन प्रत्येकी २० टक्के प्रसंगात, त्याउलट बाजाराचे अति-आकर्षक आणि अति-महाग असे परस्परविरोधी टोकाचे मुल्यांकन साधारण ४ ते ६ टक्के प्रसंगी दिसले असल्याचे त्यांनी नमूद केले. बाजाराच्या या टप्प्यांचा नेमक्या प्रसंगी वापर करून केव्हा एकरकमी गुंतवणूक करावी आणि केव्हा विभागणी करत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी, हे गुंतवणूकदारांना सुलभपणे यातून समजू शकेल असे ते म्हणाले.