मुंबई: कापड उद्योगासाठी ओपन-एंड (चात्यांविना) उच्च दर्जाच्या सूती धाग्यांचे उत्पादन घेणारी अहमदाबादस्थित युनायटेड कॉटफॅब लिमिटेडने येत्या गुरुवार, १३ जून ते बुधवार १९ जून २०२४ दरम्यान प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून गुंतवणूकदारांना अजमावणार आहे. कंपनी प्रत्येकी ७० रुपये किमतीला समभागांची विक्री करत असून, त्यायोगे ३६.२९ कोटी रुपये उभारू पाहत आहे.
हेही वाचा >>> Stock Market Update : अस्थिरतेच्या हिंदोळ्यात ‘सेन्सेक्स’ सलग दुसऱ्या सत्रात नकारात्मक
मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई एसएमई मंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी असलेल्या या आयपीओ वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान २,००० समभागांसाठी (गुंतवणूक मूल्य १.४० लाख रुपये) बोली लावावी लागेल. बीलाइन कॅपिटल ॲडव्हायजर्स ही कंपनी या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहत आहे. कापड उद्योगातील ५५ वर्षांचा अनुभव असलेल्या निर्मलकुमार मित्तल आणि त्यांचे पुत्र गगन मित्तल प्रवर्तक असलेल्या युनायटेड कॉटफॅबकडून स्पिनिंग उद्योगातील सफाई सुताचा (कॉटन वेस्ट) पुनर्वापर करून धाग्यांचे उत्पादन केले जाते, जे पर्यावरणस्नेही कापड उत्पादनांत वापरात येते. कंपनीची उत्पादन प्रक्रिया उच्च दर्जाच्या मानकांचे पालन करण्यासह, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीद्वारे समर्थित आहे. आयपीओद्वारे मिळणाऱ्या निधीतून कंपनी खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करणार आहे. कंपनी उत्पादन प्रक्रियेत हरित ऊर्जेचा वापर करते, त्यासाठी १ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प तिने स्थापित केला आहे. या प्रकल्पाची क्षमता ५ मेगावाॅटवर येत्या काही महिन्यांत नेली जाणार आहे.