पीटीआय, नवी दिल्ली
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार (एनएसएसओ), सरलेल्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत शहरी भागातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमधील एकूण बेरोजगारीचा दर ६.४ टक्क्यांवर घसरला आहे. या आधीच्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान हा दर ६.६ टक्के पातळीवर होता. देशातील एकूण श्रमशक्तीत रोजगार नसलेल्यांच्या प्रमाणावरून बेरोजगारी किंवा बेरोजगारीचा दर ठरविला जातो. गेल्या वर्षी याच जुलै ते सप्टेंबर तिमाहीत देखील शहरी बेरोजगारीचे प्रमाण ६.६ टक्क्यांवर होते.
हेही वाचा : बँकांनी प्रशासकीय चौकट भक्कम करावी – दास; अनिष्ट पद्धतींना आळा घालण्याचे गव्हर्नरांचे आवाहन
हेही वाचा : स्टेट बँक वर्षभरात आणखी ५०० शाखा सुरू करणार! सर्वात मोठ्या बँकेचे शाखाविस्तारात २३ हजारांचे लक्ष्य
u
जुलै ते सप्टेंबर २०२४ मध्ये शहरी महिलांमधील बेरोजगारीचा दर वर्षापूर्वीच्या याच तिमाहीतील ८.६ टक्क्यांवरून ८.४ टक्क्यांवर घसरला आहे. आधीच्या म्हणजेच, एप्रिल ते जून २०२४ मध्ये हा दर ९ टक्के होता. शहरी पुरुषांमध्ये, सरलेल्या तिमाहीत बेरोजगारी ६ टक्क्यांवरून ५.७ घसरली आहे, वर्षापूर्वी याच तिमाहीत तिचे प्रमाण ६ टक्के होते. पुरुष व महिला मिळून एकत्रित बेरोजगारीचा दर ६.४ टक्क्यांवर घसरल्याचे सर्वेक्षणाने म्हटले आहे. ‘एनएसएसओ’ने एप्रिल २०१७ पासून नियतकालिक श्रमशक्तीच्या सर्वेक्षणाची पद्धत सुरू केली आहे आणि यंदाची ही सर्वेक्षणाची २४ वी फेरी आहे.