हाँगकाँग/ न्यूयॉर्क : लाचखोरीच्या आरोपामुळे काही जागतिक बँका अदानी समूहाला तात्पुरते नवीन कर्ज देणे थांबविण्याचा विचार करत आहेत. शिवाय विद्यमान प्रकल्पांसाठीची कर्जेदेखील थांबवली जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत अदानी समूहावर आलेले हे दुसरे संकट आहे. मात्र त्या वेळी बार्कलेज, डॉइश बँक, मिझुहो, मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप, एसएमबीसी ग्रुप आणि स्टँडर्ड चार्टर्डसह जागतिक बँकांनी अदानी समूहाची पाठराखण केली आहे.
हेही वाचा >>> बीएसएनएलची सरशी; जिओ, एअरटेल, व्होडा-आयडियाने १ कोटी गमावले
हिंडेनबर्ग रिसर्चच्या हल्ल्याचा फटका बसल्यानंतर समूहावरील विश्वासाची या बँकांनी पुष्टी केली होती. मात्र नव्याने करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे अदानी समूहाच्या संस्थांवरील गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो. नव्याने निधी उभारणीसाठीदेखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्सने शुक्रवारी म्हटले आहे. अदानी समूहाने अमेरिकी अधिकाऱ्यांनी केलेले आरोप निराधार ठरवत, नाकारले आहेत. अदानी समूहातील बहुतेक कंपन्यांकडे स्थिर रोख प्रवाह असून भांडवलदेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र या नवीन आरोपांमुळे देशासह परदेशातील अदानी समूहाच्या विस्ताराच्या योजनांना अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय निधी उभारणीच्या योजनादेखील पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता आहे. मात्र समूहाकडे उपलब्ध निधीवरच त्याच्या व्यवसायाचे मूल्यमापन केले जाणार नाही, तर नेतृत्वस्थानी कोण आहे यावरून कर्जदारांची छाननी होईल, असे एका बँकरने सांगितले.