मुंबई : भारतीय भांडवली बाजारांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. तर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून (यू. एस. फेड) व्याजदरांबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. याचा बाजारांवर परिणाम होण्याची शक्यता गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भांडवली बाजारांमध्ये गेल्या आठवडय़ाची अखेर पडझडीने झाली होती. आठवडाभरात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक १,२९०.८७ अंशांनी (२.१२ टक्के) कोसळला. गेल्या महिनाभरात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून तब्बल १७ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. हा कल कायम राहिल्यास निर्देशांक आणखी खाली जाण्याची भीती आहे.
१ तारखेला अर्थसंकल्प मांडला जाणार असल्यामुळे पुन्हा एकदा बाजारामध्ये मोठय़ा घडामोडी बघायला मिळू शकतात, असे सॅमको सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अपूर्व शेठ यांनी स्पष्ट केले. या आठवडय़ात काही मोठय़ा कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक अहवाल येणार असून त्याचाही परिणाम बाजारांमध्ये बघायला मिळू शकेल, असे शेठ म्हणाले. तर वाहन, उत्पादन आणि सेवाक्षेत्राच्या विकासाची आकडेवारीही या आठवडय़ात येणार असल्यामुळे त्याचाही प्रभाव भांडवली बाजारांमध्ये दिसेल, अशी माहिती रेलिगेअर ब्रोकिंग्जचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी दिली.
अदानी समूहाकडे नजरा
हिंडेनबर्ग रिसर्चने दिलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली. या आठवडय़ातही गुंतवणूकदारांचे या कंपन्यांकडे बारीक लक्ष असेल. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार काय करतात हे महत्त्वाचे ठरेल, असे स्वस्तिका इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले.