US-China Tariff War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह ७५ देशांसाठी आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाला ९० दिवसांसाठी स्थगिती देण्याची घोषणा केल्यानंतर, याचा परिणाम भारतीय शेअर बाजार पाहायला मिळाले. शुक्रवारी भारतीय शेअर बाजार उघडला तेव्हा त्यामध्ये तेजी दिसून आली.

बीएसई सेन्सेक्सने १,०६१.२६ अंकांची उसळी घेत तो ७४,९४१.५३ वर उघडला तर एनएसई निफ्टी हा ३५४.९० अंकांनी वर गेला आणि दिवसाची सुरूवात २२,७५४.०५ ने झाली. अमेरिकेच्या चीनबरोबर सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात देखील तणाव पाहायला मिळत होता, पण ९० दिवसांच्या स्थगितीच्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांच्या मानसिकतेमधील बदल बाजारातील तेजीच्या स्वरुपात दिसून आला.

आशियाई बाजारात घसरण

भारतीय शेअर निर्देशांकात तेजी पाहायला मिळत असताना इतर आशियाई बाजारात मात्र घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेतील शेअर बाजारांनी आदल्या दिवशी झालेली ऐतिहासिक वाढ बरीचशा प्रमाणात कमी झाल्याने शुक्रवारी आशियाई शेअर बाजारात घसरण झाली. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला जपानचा Nikkei २२५ शेअर निर्देशांक ५.६ टक्क्यांनी खाली आला. टोकियो येथे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तो ४.२ टक्के खाली जाऊन ३३,१४८.४५ वर पोहचला.

दक्षिण कोरियाचा Kospi निर्देशांक हा १.३ टक्के कोसळून २,४१३ वर पोहचला. चीनच्या बाजारात हाँगकाँगचा हेंग सेंग निर्देशांक ०.४ टक्क्यांने खाली जाऊन २०,६०६.०४ वर पोहचला आणि शांघाई देखील ०.२ टक्के घसरणीसह ३,२१८.९४ नोंदवला गेला.

आशियाई बाजारातील मंदी दिसत असताना दुसरीकडे भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी का आहे? याची नेमकी कारणे काय आहेत? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

आयातशुल्काला स्थगिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतासह अनेक देशांवर व्यापार कर लादला आहे. यामध्ये त्यांनी भारतावर २६ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता अमेरिकेने ९ जुलैपर्यंत भारतासह इतर काही देशांवरील अतिरिक्त व्यापार कर ९० दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली आहे. हे एक भारतीय शेअर बाजारातील तेजीचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अतिरिक्त व्यापारकर वाढीचा हा आदेश ९ एप्रिलपासून लागू झाला होता, परंतु ट्रम्प यांनी आता तो ९० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. पण, व्यापारकरावरील हे निलंबन हाँगकाँग, मकाऊ आणि चीनला लागू होणार नाही

अमेरिका-चीन व्यापार युद्ध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयतीवर लावलेले शुल्क सध्या किमान १४५ टक्के आहे. हे खूपच जास्त असल्याने अर्थ तज्ज्ञांच्या मते यामुळे अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार मंदावू शकतो. तर दुसरीकडे चीनवर लावलेल्या आयातशुल्कामुळे भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. हे देखील शेअर बाजारातील तेजीचे कारण असू शकते

आरबीआयकडून रेपो दरात कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात २५ बेसिस पाँइट्सनी कपात केली आहे. ही कपात सलग दुसऱ्यांदा करण्यात आली आहे. अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी ही कपात करण्यात आली आहे.
या दरातील कपातीनंतर मुख्य धोरणात्मक दर सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत ज्यामुळे गृह, वाहन आणि कॉर्पोरेट कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.