US-China Trade War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम जगभरातील बाजारावर पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या भीतीने अमेरिकन शेअर बाजार कोसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, करा काही प्रमाणात भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळली. चीन सोडून बहुतांश देशांवर लादलेल्या व्यापार कराला ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर अमेरिकेाचा डाऊ, एसअँडपी ५०० आणि नॅसडॅक हे निर्देशांक जोरात आपटले आहेत. यानंतर चीनने देखील अमेरिकेला प्रत्युत्तर देत अमेरिकी मालाच्या आयातीवर भरमसाठ कर लादले आहेत.

आशियाई बाजारांमध्ये देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. जपानच्या निक्केई आणि हाँगकाँगच्या Hang Seng निर्देशकामध्ये मोठी घसरण झाली. पण भारताता मात्र वेगळा ट्रेंड पाहायला मिळाला. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे स्थिर राहिले. दरम्यान जगभरातील बाजारात उलथा पालथ होत आहे. यादरम्यान भारतीय गुंतवणूकदारांना काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

आयातशुल्काला ९० दिवसांची स्थगिती

अमेरिकेने चीनवर १४५ टक्के आयातशुल्क लावले आहे, यामुळे भारतीय निर्यातदारांच्या आशेचा किरण दिसत आहे. भारतीय अधिकारी या ९० दिवसांच्या काळात अमेरिकेबरोबर व्यापारी करार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, दरम्यान दोन्ही देशांमधील चर्चेतून काहीतरी मार्ग काढला जाईल या आशेमुळे गुंतवणूकदार सकारात्मक विचार करताना दिसत आहेत. जर भारत अमेरिकेबरोबर अनुकूल करार करू शकला तर यामुळे विविध क्षेत्रांसाठी दरवाजे उघडू शकतात.

अमेरिका- चीन व्यापार युद्धात भारताचा फायदा?

व्यापार युद्ध सुरू असताना अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. यामुळे जागतिक कंपन्या या चीनला पर्याय शोधताना दिसत आहेत. या कंपन्यांसाठी भारत हा पर्याय ठरू शकतो. चिप बनवणाऱ्या कंपन्या किंवा कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात भारत हा एक विश्वासार्ह पर्याय म्हणून स्वत:ला सादर करत आहे.

आरबीआय दर कपात

या आठवड्याच्या सुरुवातीलाच तरलता आणि वापर वाढवण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात केली आहे. यामुळे थेट ऑटो, एफएमसीजी आणि बांधकाम क्षेत्र यासारख्या व्याजदर-संवेदनशील क्षेत्रांवर याचा थेट परिणाम होईल. विकास मंदावण्याची चिंता असताना देखील आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी हे फायदेशीर ठरले आहे.

चौथ्या तिमाहीकडे लक्ष

चौथ्या तिमाहीचे निकाल खासकरून लार्ज-कॅप कंपन्यांसाठी तिसऱ्या तिमाहीपेक्षा चांगले असू शकतात असा विश्वास वाढताना दिसत आहे. या अपेक्षेमुळे काठावर असलेल्या गुंतवणूकदारांना थोडाफार दिलासा मिळत आहे.

गुंतवणूकदारांनी प्रवाहात उडी घ्यावी का?

गुंतवणूकदारांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी घाई करू नये असे विषयातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. बहुतेक विश्लेषक हे काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. सध्या बाजारात अस्थिरता कायम असून अमेरिका-चीन यांच्यातील वादात वाढल्यास जागतिक स्तरावर बाजारात आणखी गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते.