Hindenburg Research हिंडनबर्ग रिसर्चच्या संस्थापकांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एक्स या सोशल मीडिया साईटवर त्यांनी ही माहिती दिली आहे. नॉथन अँडरसन हे या कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून कंपनी बंद करत असल्याचा निर्णय जाहीर केला. कंपनी बंद करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत, आम्ही जे काही ठरवलं होतं ते पूर्ण झाल्याने आता आम्ही कंपनी बंद करत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
नॉथन अँडरसन काय म्हणाले?
नॉथन अँडरसन यांनी जी पोस्ट केली आहे त्यात ते म्हणाले, मला सुरुवातीला हे ठाऊक नव्हतं की नंतर असा काही पर्याय निवडावा लागेल. हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद करणं हा सोपा निर्णय नव्हता. मी जेव्हा कंपनी सुरु केली तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारत असे की ही कंपनी चालवण्यासाठी आपण तेवढे सक्षम आहोत का? कारण माझ्याकडे अशा प्रकारची रिसर्च कंपनी चालवण्याचा कुठलाही पारंपरिक अनुभव नव्हता. माझे नातेवाईक किंवा मित्रही अशा प्रकराच्या क्षेत्रात कार्यरत नाहीत. मी सरकारी शाळेत शिकलो आहे. मी सुपरह्युमनही नाही जो चार तास झोप घेऊन दिवसभर कार्यरत राहू शकतो किंवा मी कपडे कसे घातले पाहिजेत? त्याबाबतही मला फारशी माहिती नाही. एवढंच काय मी तर गोल्फही खेळत नाही असं म्हणत अँडरसन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे पण वाचा- Adani Power चे शेअर्स दोन दिवसांत २७ टक्क्यांनी कशामुळे वाढले? कंपनीने सांगितले कारण
ब्रायन वुड यांचा पोस्टमध्ये विशेष उल्लेख
नॉथन अँडरसन पुढे म्हणतात, मी आजवर ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली तिथे मी एक चांगला कर्मचारी म्हणून काम केलं. मी जेव्हा हिंडनबर्ग रिसर्च कंपनी सुरु केली तेव्हा माझ्याकडे म्हणावे तसे पुरेसे पैसेही नव्हते. तसंच जे काही तीन खटले माझ्या कंपनीविरोधात झाले त्यात माझे साठवलेले पैसेही खर्च झाले. जर मला जागतिक ख्याती असलेले वकील ब्रायन वुड यांनी पाठिंबा दिला नसता तर मी आर्थिक डबघाईला आलो असतो. माझ्याकडे आर्थिक स्रोत कमी आहेत हे माहीत असूनही त्यांनी मला सांभाळून घेतलं. या क्षेत्रात मी एखाद्या नवजात बालकाप्रमाणे होतो. मी काहीसा चिंतेत आणि घाबरलेलाही होतो. तरीही मी पुढे जाण्याचा पर्याय निवडला पण आज अखेर मी माझी कंपनी बंद करत असल्याचं जाहीर करतो आहे.
आमचा सत्यावर विश्वास आहे-अँडरसन
अँडरसन त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हणले, आमचा विश्वास फक्त वास्तवावर आहे. या क्षेत्रात कुणीही समोर असलो तरीही आम्ही सत्य काय आहे तेच प्रकाशात आणण्याचा कायम प्रयत्न केला. आम्हाला अपेक्षा आहे की सत्यावर असलेला आमचा विश्वास हाच आम्हाला योग्य मार्ग दाखवेल. प्रचंड दबाव असतानाही आम्ही काम करु शकलो, त्या कामात मन रमवू शकलो याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे.
आम्ही अनेक साम्राज्यांना धक्के दिले-अँडरसन
नॉथन अँडरसन म्हणाले, भ्रष्टाचार, खोटेपणा, गैरव्यवहार यावर आम्ही पुरावे दाखवून प्रहार केले आहेत. आम्ही असे लढे दिले आहेत जे कुठल्याही व्यक्तीपेक्षा किंवा कुठल्याही साम्राज्यापेक्षा मोठे आहेत. कारण ते लढे सत्य समोर आणण्यासाठीचे होते. लबाडी, भ्रष्टाचार, नकारात्मकता याचा सुरुवातीचा परिणाम हा प्रभावीच वाटतो, पण सत्याची वाट आम्ही सोडली नाही त्यामुळे ही वाटचाल करु शकलो. तसंच आम्ही काही साम्राज्यांना धक्के देण्याचं काम केलं हेदेखील आम्हाला माहीत आहे. आमच्या कामामुळे किमान १०० व्यक्तींच्या विरोधात दिवाणी खटले दाखल झाले आहेत. ज्यामध्ये काही अब्जाधीश आणि उच्चभ्रूंचा समावेश आहे असंही अँडरसन यांनी स्पष्ट केलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
अदाणी समूहावर काय आरोप करण्यात आले होते?
हिंडनबर्ग रिसर्च या कंपनीने त्यांच्या अहवालात २०२३ मध्ये अदाणी समूहावर गंबीर आरोप केले होते. कॉर्पोरेट विश्वात अदाणी समूहाने आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याचं या अहवालात म्हटलं होतं. त्यावेळी गौतम अदाणी हे जगातल्या चौथ्या क्रमांकाचे अब्जाधीश होते. या अहवालामुळे भारतात बरीच खळबळ माजली होती. या अहवालाचे पडसाद संसदेत उमटले होते. आता हीच रिसर्च कंपनी बंद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.