वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवगळता विविध देशांवर लादलेल्या व्यापार शुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिल्याच्या परिणामी अमेरिकेसह जभगभरातील भांडवली बाजारात गुरुवारी अभूतपूर्व उत्साह संचारला. अमेरिकेचा डाऊ जोन्स निर्देशांक २,९०० अंशांनी वधारला तर एस अँड पी ५०० निर्देशांक ९.५२ टक्क्यांनी वधारला. दोन्ही निर्देशांकांनी वर्ष २००८ नंतरची एका दिवसांतील सर्वात मोठी वाढ बुधवारच्या सत्रात नोंदवली, युरोपीय बाजारांतील प्रमुख निर्देशांकांनी ४ टक्क्यांहून मोठ्या उसळीसह गुरुवारच्या सत्राला सुरुवात केली.

आशियाई आणि युरोपीय बाजारातील गुरुवारच्या उत्साही कलाचे प्रतिबिंब हे शुक्रवारी स्थानिक भांडवली बाजारातही उमटताना दिसतील, अशी शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली. श्री महावीर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने गुरुवारी मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील व्यवहार बंद होते.

गेल्या आठवड्यापासून अत्यंत दबावाखाली असलेल्या अमेरिकी भांडवली बाजारांनी बुधवारच्या सत्रात इतिहासातील सर्वात मोठी तेजी अनुभवली. एस अँड पी ५०० निर्देशांक ९.५२ टक्क्यांनी वधारून ५,४५६.९० पातळीवर स्थिरावला, २००८ नंतरची एका सत्रात झालेली सर्वात मोठी वाढ आहे. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डाऊ जोन्स इंडस्ट्रियल निर्देशांकांसाठी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी तेजी ठरली. तो २,९६२.८६ अंशानी म्हणजेच ७.८७ वधारून ४०,६०८.४५ पातळीवर बंद झाला, जी मार्च २०२० नंतरची टक्केवारीच्या संदर्भातील सर्वात मोठी वाढ आहे.

नॅसडॅक देखील १२.१६ टक्क्यांनी वधारून १७,१२४.९७ पातळीवर बंद झाला. जानेवारी २००१ नंतरची त्याची ही सर्वात मोठी एकदिवसीय वाढ आहे. सुमारे ३० अब्ज समभागांचे व्यवहार पार पडले असून, वॉल स्ट्रीटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा उलाढालीचा दिवस ठरला.

सुमारे ७५ देशांवरील व्यापार शुल्काला तूर्तास विराम दिला असला तरी चीनवरील व्यापारशुल्क मात्र १२५ टक्क्यांपर्यत वाढले आहे. चीन वगळता सर्व देशांची सध्या वाटाघाटी सुरू आहेत, असे अमेरिकी ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट केले. व्यापार युद्धाच्या तणावामुळे गेल्या काही सत्रात निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या मोठ्या कंपन्यांच्या समभागांवर मोठा दबाव होता. मात्र बुधवारच्या सत्रात समभागांच्या किमतींनी पुनरागमन केले. तंत्रज्ञान क्षेत्रातील ॲपल आणि एनव्हीडियाचे समभाग अनुक्रमे १५ टक्के आणि १९ टक्क्यांहून अधिक वधारले. तर विद्युत वाहन निर्माता कंपनी टेस्लाचे समभाग २२ टक्क्यांनी वधारले.

आशियाई बाजारांमध्ये बुधवारी, टोक्योचा निक्केई २२५ निर्देशांक ९.१३ टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा कोस्पी ६.६० टक्क्यांनी, हाँगकाँगचा हँग सेंग २.०६ टक्क्यांनी आणि चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट निर्देशांक देखील १.१६ टक्क्यांनी वधारला. ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स २०० निर्देशांक ४.५ टक्के वाढला.