पीटीआय, नवी दिल्ली
बँकिंग क्षेत्राची सध्या कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि मशिन लर्निंग (एमएल) यावरील भिस्त खूप वाढली असून, त्यांचा अतिरेकी वापर चिंताजनक आहे. बँकिंग क्षेत्राकडून यासंबंधाने पुरती काळजी घेतली जावी, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी दिला.
दास म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कृत्रिम प्रज्ञा आणि मशिन लर्निंगच्या माध्यमातून व्यवसायाच्या नवीन संधी वित्तीय संस्थांना निर्माण झाल्या आहेत. त्यांना नफ्यात वाढ करण्याची संधी यातून मिळत आहे. असे असले तरी या तंत्रज्ञानामुळे वित्तीय स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो. कृत्रिम प्रज्ञेवर गरजेपेक्षा जास्त भिस्त ठेवणे चुकीचे आहे. कारण या तंत्रज्ञानाचा पुरवठा करणाऱ्या काही मोजक्या कंपन्यांच्या हाती बाजारपेठ जाणार आहे. त्यातून व्यवस्थेतील जोखीम वाढू शकते. एखाद्या वेळी या यंत्रणेत बिघाड झाल्यास तिचे परिणाम संपूर्ण वित्तीय व्यवस्थेवर होतील.
हेही वाचा >>>तुमच्या Gross Salary पेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष मिळणारी Net Salary कमी का असते? हे बाकीचे पैसे जातात कुठे?
कृत्रिम प्रज्ञेचा अंगिकार वाढलेला असताना त्यातून सायबर हल्ले आणि विदा चोरीचे प्रकार देखील वाढू लागले आहेत. त्यामुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी हे धोके कमी करण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. कृत्रिम प्रज्ञेसह इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आपल्यावर स्वार होऊ देण्याऐवजी बँकांनी या तंत्रप्रणालीवर सर्व खबरदारीसह स्वार झाल्याचे चित्र दिसायला हवे, असे दास यांनी नमूद केले.