नवी दिल्ली : सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रवासी वाहने आणि दुचाकींच्या विक्रीमध्ये ७ टक्क्यांची घसरण झाली आहे, अशी माहिती अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने गुरुवारी दिली. गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत एकूण १८.९९ लाख वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षीच्या २०.४६ लाख वाहनांच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घटली आहे.

फेब्रुवारीमध्ये सर्व श्रेणींमध्ये व्यापक मंदी दिसून आली, असे ‘फाडा’चे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर म्हणाले. महिन्याभरात वितरकांनी त्यांच्या संमतीशिवाय नवीन वाहने उत्पादकांकडून रवाना केली जात असल्याबद्दल विघ्नेश्वर यांनी चिंता व्यक्त केली. फेब्रुवारीमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक १० टक्क्यांनी घट होऊन ती ३.०३ लाख राहिली. दुचाकींच्या विक्रीमध्ये देखील ६ टक्क्यांची घट होऊन ती १३.५३ दुचाकींवर मर्यादित आहे. तर गेल्यावर्षी याच महिन्यात १४.४४ दुचाकी विकल्या गेल्या होत्या.

फेब्रुवारीमध्ये वाणिज्य वाहनांच्या किरकोळ विक्रीत ९ टक्क्यांनी घट होऊन ती ८२,७६३ वाहनांवर मर्यादित राहिली. तर ट्रॅक्टरची विक्री वार्षिक आधारावर १४.५ टक्क्यांनी घसरली असून ६५,५७४ ट्रॅक्टरची विक्री झाली. येत्या काळात होळी आणि गुढीपाडव्यासारखे सणोत्सव वाहन खरेदीला चालना देतील अशी ‘फाडा’ची अपेक्षा आहे.

तूर्त कमकुवत ग्राहक भावना, वाहन खरेदीसाठी घटलेले चौकशीचे प्रमाण आणि मर्यादित वित्त उपलब्धता यामुळे आव्हाने वाढली आहेत. शिवाय सध्याची तरलतेची कमतरता आणि महागाई यासारख्या बाह्य आर्थिक दबावांबद्दलच्या चिंतेमुळे ही आव्हाने आणखी तीव्र झाली आहेत. ग्रामीण बाजारपेठेतील घसरणीच्या तुलनेत शहरी भागात मोठी घसरण झाली.

Story img Loader