नवी दिल्ली : सरलेल्या २०२२ सालात सर्व प्रकारच्या एकूण वाहन विक्रीत १५.२८ टक्क्यांची वाढ झाली आणि एकूण २.११ कोटी वाहने विकली गेली. विशेषत: प्रवासी वाहने त्याचप्रमाणे ट्रॅक्टरच्या विक्रमी विक्रीमुळे हा टप्पा गाठता आला, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने गुरुवारी दिली.
यापूर्वी २०२१ मध्ये, भारतातील वाहनांच्या एकूण किरकोळ विक्रीने १.८३ कोटींचा टप्पा गाठला होता. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जागतिक पातळीवर अर्धसंवाहकाचा (सेमीकंडक्टर) सुधारलेला पुरवठा आणि वाहन निर्मात्या कंपन्यांकडून वाढलेल्या वाहनाच्या पुरवठय़ामुळे सरलेल्या वर्षांत वाहन विक्रीला दोन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दुचाकीच्या आघाडीवर २०२२ मध्ये १,५३,८८,०६२ दुचाकी विकल्या गेल्या. २०२१ च्या तुलनेत त्यात १३.३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यावर्षी १,३५,७३,६८२ दुचाकींची विक्री झाली होती.
सरलेल्या २०२२ मध्ये ३४,३१,४९७ प्रवासी वाहनांची विक्री झाली, जी २०२१ मध्ये २९,४९,१८२ वाहने अशी होती. त्यात वर्षांगणिक १६.३५ टक्क्यांची वाढ साधली गेली आहे.
कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये, २०२१ च्या तुलनेत एकूण वाहन विक्रीत वार्षिक १५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली असली तरी कॅलेंडर वर्ष २०१९ म्हणजेच करोनापूर्व पातळीवर वाहन विक्री अद्याप पोहोचलेली नाही, असे फाडाचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले. प्रवासी वाहन संख्येने विक्री ३४ लाख वाहनांचा टप्पा ओलांडला आहे. त्यापाठोपाठ ट्रॅक्टरची चांगली विक्री झाली असून या आघाडीवर करोनापूर्व पातळीपेक्षा चांगली कामगिरी झाली असून, एकूण ७.९४ लाख ट्रॅक्टरची ऐतिहासिक विक्री नोंदवली गेली आहे.
सातत्याने होत असलेला समाधानकारक पाऊस, शेतकऱ्यांकडे असलेला रोख प्रवाह, पिकांचा चांगला हमीभाव यामुळे हे यश शक्य झाले आहे, असेही सिंघानिया म्हणाले.
डिसेंबरमध्ये मात्र विक्री मंदावली!
सरलेल्या डिसेंबर २०२२ मध्ये एकूण वाहनांची विक्री ५.४ टक्क्यांनी कमी होऊन १६,२२,३१७ वाहनांवर मर्यादित राहिली आहे. जी गेल्या वर्षी याच महिन्यात १७,१४,९४२ नोंदवली गेली होती. तर दुचाकी वाहनांची विक्री ११.१९ टक्क्यांनी घटली. डिसेंबर २०२१ मध्ये १२,७५,८९४ दुचाकी विकल्या गेल्या होत्या. तर सरलेल्या डिसेंबर २०२२ मध्ये ११,३३,१३८ दुचाकींची विक्री झाली, अशी माहिती ‘फाडा’ने दिली.