पीटीआय, नवी दिल्ली

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत असल्याने वाहन निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढविण्याचे पाऊल उचलले आहे. टाटा मोटर्स कंपनीकडून वाणिज्य वाहनांच्या किमतीत एप्रिलपासून २ टक्क्यांपर्यंत वाढ, तर प्रवासी वाहनांच्या क्षेत्रातील मारूती सुझुकीकडून मोटारींच्या किमतीत ४ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.

टाटा मोटर्सने कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत असल्याने वाणिज्य वाहनांच्या किमती १ एप्रिलपासून २ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सोमवारी स्पष्ट केले. प्रत्येक मॉडेलसाठी किंमतवाढ वेगवेगळी असेल. टाटा समूहातील या कंपनीकडून मालमोटारी (पिक-अप्स) आणि बसची निर्मिती केली जाते. टाटा मोटर्सचा समभाग मुंबई शेअर बाजारात सोमवारी ०.८४ टक्क्याने वधारून ६६० रुपयांवर बंद झाला.

मारूती सुझुकी कंपनीकडून प्रवासी मोटारींच्या किमतीत १ एप्रिलपासून ४ टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचे कारण कंपनीने यासाठी दिले. ग्राहकांवर जास्त बोजा न टाकण्याची भूमिका मांडत आलेल्या या कंपनीने या आधी १ फेब्रुवारीपासून तिच्या वाहनांच्या किमतीत ३२,५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मारूती सुझुकीचा समभाग सोमवारी मुंबई शेअर बाजारात ०.६१ टक्क्याने वाढून ११,५७८ रुपयांवर बंद झाला.

टाटा मोटर्स, मारुती सुझुकी या अग्रणी कंपन्यांनी टाकलेल्या किमतवाढीच्या पावलांचे अन्य वाहन निर्मात्यांकडून अनुकरण केले जाण्याची शक्यता असल्याने एप्रिलमध्ये सर्वच वाहने महागताना दिसतील.

Story img Loader