वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भांडवली बाजार नियामक सेबीने विजय मल्ल्याला रोखे बाजारात व्यवहार करण्यापासून तीन वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे. सेबीने २६ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार, मल्ल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोखे बाजारात खरेदी, विक्री किंवा अन्यथा व्यवहार करण्यास किंवा रोखे बाजाराशी कोणत्याही प्रकारे संबंधित राहण्यास प्रतिबंध केला आहे. २६ जुलै २०२४ पासून पुढील तीन वर्षांच्या कालावधी ही बंदी घातली आहे. त्याला कोणत्याही सूचिबद्ध कंपन्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संलग्न राहण्यास देखील बंदी घातली आहे.
मल्ल्या सध्या त्याच्याच समूहातील कंपन्यांशीसंबंधित समभागांचे खरेदी -विक्री व्यवहार करत होता का, याचा तपास नियामक करत होता. मल्ल्या हा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार नियमांच्या चौकटीचा गैरवापर करत असल्याचे आढळून आल्याची माहिती सेबीच्या मुख्य महाव्यवस्थापक, अनिथा अनूप यांनी दिली.