प्रसिद्ध उद्योजक आणि रेमंड ग्रुपचे एमडी गौतम सिंघानिया हे त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून विभक्त झाल्याने गेल्या वर्षी चर्चेत आले होते. सोशल मीडियावर घोषणा करत गौतम सिंघानिया यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याआधी गौतम सिंघानिया वडील विजयपत सिंघानिया यांना हाकलून दिल्याने चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी या दोघांचा एक एकत्र आल्याचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. याबाबत आता विजयपत सिंघानियांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजयपत सिंघानिया झाले होते बेघर

गौतम सिंघानिया हे त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांच्याशी झालेल्या वादांमुळे चर्चेत आले होते. विजयपत सिंघानिया यांनी रेमंड या समूहाची स्थापना केली. रेमंड हा कापड उद्योगातला असा ब्रांड आहे ज्या ब्रांडने मोठं नाव कमावलं आणि कापड व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण केली. विजयपत सिंघानिया यांनी सुरु केलेला हा ब्रांड गौतम सिंघानिया यांनी एखाद्या वटवृक्षाप्रमाणे मोठा केला. मात्र त्यांनी वडिलांना घरातून हाकलून दिलं. तसंच उद्योग समूहातूनही त्यांना दूर केलं. या घटनेनंतर विजयपत सिंघानिया भाडे तत्त्वावरच्या घरात राहात होते. काही दिवसांपूर्वी या दोघांचा एकत्र फोटो समोर आला आणि दोघांमधला वाद संपल्याच्या चर्चा झाल्या. त्याबाबत आता विजयपत सिंघानियांनी भूमिका मांडली.

हे पण वाचा- गौतम सिंघानिया आणि नवाज मोदींच्या भांडणात कंपनीचं कोट्यवधींचं नुकसान, रेमंड ग्रुपवर दुहेरी संकट

काय म्हटलं आहे विजयपत सिंघानियांनी?

“मी २० मार्चला विमानतळावर जात होतो तेव्हा गौतमच्या असिस्टंटने मला घरी येण्याची विनंती केली. मी त्याला नकार दिला तेव्हा त्याने पुन्हा विनंती केली. त्यानंतर गौतमने माझ्याशी संपर्क केला. मी पाच मिनिटांची वेळ दिली. कॉफी प्यायला येईन आणि पाच मिनिटं थांबेन असं गौतमला सांगितलं. इच्छा नसतानाही मी तिकडे गेलो. गौतम माझ्यासह फोटो काढून मीडियाला संदेश देऊ इच्छित होता, त्यामुळे मला बोलवलं होतं. त्याचा हा हेतू मला समजला नाही. मी काही मिनिटांनी खाली आलो आणि विमानतळाकडे निघालो. त्यानंतर काही वेळातच त्याच्यासह माझे फोटो होते आणि वाद मिटल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हे पूर्णतः चुकीचं आहे.” असं विजयपत सिंघानियांनी इंडिया टुडेला सांगितलं आहे.

गौतम सिंघानिया यांनी काय म्हटलं होतं?

माझे वडील आज माझ्या घरी आले आहेत. त्यामुळे मी आनंदी आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेत आहे. बाबा तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. या आशयाची पोस्ट एक्सवर गौतम सिंघानियांनी केली. त्यात फोटोही होता. त्यामुळे या दोघांमधला वाद मिटल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र विजयपत सिंघानियांनी या सगळ्या चर्चा फेटाळल्या आहेत. आमच्यातले वाद मिटलेले नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijaypat singhania denies reconciling with son gautam doubts his real motive scj