वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड यांची संयुक्त मालकी असलेली ‘विस्तारा’चे, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घोषित करण्यात आलेल्या करारानुसार एअर इंडियामध्ये विलीन केली जाणार आहे. या प्रस्तावित विलीनीकरणाआधी विस्ताराच्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियाच्या सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली.

टाटा समूहाच्या मालकीच्या या दोन्ही कंपन्या असून, हवाई वाहतूक क्षेत्रातील वर्चस्व वाढवून, विशेषत: कमी खर्चातील हवाई सेवा ‘इंडिगो’ला टक्कर देण्याच्या दिशेने समूहाने वाटचाल सुरू केली आहे. तथापि, विस्तारा आणि एअर इंडिया यांच्या विलीनीकरणाला अद्याप नियामकांची परवानगी आणि अन्य सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत.

आणखी वाचा-एचडीएफसी बँकेचा नफा ३० टक्के वाढीसह ११,९५२ कोटींवर

विलीनीकरणाच्या प्रक्रियेबाबत विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कन्नन यांनी स्पष्ट केले की, विस्ताराच्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियामध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विलीनीकरणाला नियामकांची मंजुरी एप्रिल २०२४ पर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे. दोन्ही कंपन्या एकत्र झाल्यानंतर अंतिम रचना कशी असेल, यावर चर्चा करण्यासाठी विस्ताराने एक समिती नेमली आहे. याचबरोबर कंपनीने वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांशी विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू केली आहे.

आणखी वाचा-डिजिटल देयक बाजारपेठेवर वर्चस्वाची लढाई, नावीन्यता आणि तंत्रज्ञानसुलभतेने फोनपेची स्पर्धकांवर आघाडी

विलीनीकरण कसे होणार?

विस्तारा ही कंपनी टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्या मालकीची आहे. टाटा समूहातील एअर इंडियामध्ये तिचे विलीनीकरण केले जाणार आहे. याबाबतची घोषणा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली होती. सध्या भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात इंडिगोचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला शह देणे विलीनीकरणानंतर एअर इंडियाला शक्य होणार आहे. विलीनीपश्चात हवाई सेवेचे ‘विस्तारा’ हे नाव लोप पावून, ती एअर इंडियाच्या सेवेचा एक भाग बनेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vistara staff in the service of air india print eco news mrj