नवी दिल्ली : कर्जजर्जर बनलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाने उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या कंपनीशी भागीदारीसंदर्भात आणि भागभांडवलाच्या खरेदीच्या शक्यतेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. परिणामी, मंगळवारच्या सत्रात कंपनीच्या समभागात ५.५९ टक्क्यांनी घसरण झाली.
हेही वाचा >>> बिटकॉइनचे मूल्य ४५,००० डॉलरपल्ल्याड; ‘ईटीएफ’ना मंजुरीच्या आशेने दोन वर्षांतील उच्चांकी झेप
स्टारलिंक देशातील दूरसंचार क्षेत्रात पहिल्यांदाच प्रवेश मिळवण्यासाठी व्होडा-आयडियाशी करार करू शकते, अशा वृत्ताने भांडवली बाजारात सोमवारच्या सत्रात व्होडा-आयडियाचा समभाग वधारला होता. स्टारलिंकचा प्रवेश सुकर करण्यासाठी केंद्र सरकार व्होडा-आयडियामधील त्यांचे ३३.१ टक्के भागभांडवल मस्क यांना विकू शकतील, असे वृत्तदेखील पसरले होते. मात्र मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनांत व्होडा-आयडियाने या वृत्ताचे खंडन केल्यानंतर कंपनीचा समभाग मंगळवारी ५.५९ टक्क्यांनी घसरून १६.०५ रुपयांवर स्थिरावला. गेल्या काही सत्रांत शेअरने या वृत्तामुळे १८.४० रुपये ही ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली होती.