नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या दरवाढीनंतर भारती एअरटेल आणि व्होडा-आयडियाने या दोन्ही शुक्रवारी प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल दरांमध्ये प्रत्येकी १० ते २१ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर दूरसंचार कंपन्यांनी मोठी दरवाढ केल्यामुळे या निर्णयाला महत्त्व आहे. एअरटेल आणि व्होडा-आयडियाच्या विविध प्लॅनमध्ये १० ते २१ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे.एअरटेलची नवीन दरवाढ पुढील महिन्यात ३ जुलैपासून लागू होईल तर व्होडा-आयडियाने ४ जुलैपासून दरवाढीची घोषणा केली आहे.

हेही वाचा >>> वित्तीय तूट ३ टक्क्यांवर; महालेखापालांची माहिती, चालू आर्थिक वर्षातील मेअखेरची स्थिती

महागाईचा सामना करावा लागत असलेल्या ग्राहकांचा विचार करून कंपनीने मोबाइल दरांमध्ये अतिशय माफक वाढ केली आहे. ग्राहकांच्या खर्चात दररोज ७० पैशांपेक्षा कमी भर पडणार आहे. देशातील दूरसंचार क्षेत्र आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोबाइल सरासरी महसूल प्रति वापरकर्ता ३०० रुपयांच्या वर असणे आवश्यक आहे. यादरवाढीमुळे प्रगत तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम खरेदीसाठी आवश्यक असलेली भरीव गुंतवणूक करणे शक्य होणार आहे, असे एअरटेलकडून सांगण्यात आले. तर व्होडा-आयडिया देशभरात ४जी आणि ५जी सेवा सुरू करण्यासाठी पुढील काही तिमाहीमध्ये मोठ्या गुंतवणूकीची योजना आखत असल्याचे कंपनीने सांगितले.

कंपन्यांकडून दरवाढ कशी?

एअरटेलने जवळपास सर्व वैधता कालावधीच्या योजनांवरील मोबाइल सेवांचे दर वाढवले आहेत. सर्वात कमी रिचार्जची किंमत आता ३ रुपयांनी वाढून २२ रुपये करण्यात आली आहे, त्यासाठी आधी १९ रुपये आकारले जात होते. ३६५ दिवसांच्या वैधतेसह दिवसाला २ जीबी डेटा प्लॅनची किंमत ६०० रुपये करण्यात आली आहे. तर अमर्यादित सेवा श्रेणीतील प्लॅनची किंमत २,९९९ रुपयांवरून ३,५९९ रुपये केली आहे. २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये २० रुपयांची वाढ करून तो १७९ वरून १९९ रुपये करण्यात आला आहे. व्होडा-आयडियाच्या २८ दिवसांच्या वैधतेसह २ जीबी डेटा प्लॅनची किंमत १७९ रुपयांवरून वाढवून १९९ रुपयांवर नेली आहे. ८४ आणि ३६५ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत अनुक्रमे आता ५०९ आणि १,९९९ असेल. जिओने गुरुवारी मोबाइल दरांमध्ये १२ ते २७ टक्क्यांची वाढ केली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea hikes tariffs of postpaid prepaid plans from july 4 print eco news zws