नवी दिल्ली : कर्जजर्जर व्होडाफोन-आयडियाला चालू आर्थिक वर्षांतील जून तिमाहीअखेर मोठय़ा तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे. कंपनीला आर्थिक वर्षांच्या अखेरच्या तिमाहीत ७,६७५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ६,४१९ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. व्याज आणि वित्तपुरवठा खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या खर्चात वाढ झाली आहे. व्होडाफोन-आयडिया ही विलीनीकरणाच्या मध्यमातून एकेकाळी देशातील सर्वाधिक ग्राहकसंख्या असलेली कंपनी होती.
हेही वाचा >>> दूरसंचार कंपन्यांकडून ध्वनिलहरी लिलावासाठी ४,३५० कोटींची अग्रिम ठेव जमा; जिओ ३,००० कोटी रुपयांसह आघाडीवर
३१ मार्च २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला ३१,२३८.४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, जो वर्षभरापूर्वी २९,३०१.१ कोटी रुपये होता. महसुलाच्या आघाडीवर देखील निराशा झाली असून सरलेल्या तिमाहीत त्यात नगण्य वाढ झाली आहे. तो गेल्यावर्षी याच तिमाहीत असलेल्या १०,५३१ कोटी रुपयांवरून किंचित वधारून १०,६०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. व्होडाफोन-आयडियाचा प्रति ग्राहक महसूल मार्च २०२४ दरम्यान ७.६ टक्क्यांनी वाढत १४६ रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत तो १३५ रुपये होता. गेल्या महिन्यात व्होडाफोन-आयडियाने समभाग विक्रीच्या माध्यमातून १८,००० कोटींचा निधी उभारला होता.