पीटीआय, नवी दिल्ली
आघाडीची ब्रिटिश दूरसंचार कंपनी व्होडाफोनने इंडस टॉवर्समधील १८ टक्के भागभांडवल सुमारे १५,३०० कोटी रुपयांना विकले, अशी माहिती कंपनीने बुधवारी दिली. यातून मिळणारा बहुतांश निधी भारतातील व्होडाफोनवर असलेले १.८ अब्ज युरोचे थकीत कर्ज कमी करण्यासाठी वापरला जाणार आहे.

व्होडाफोन समूहाने इंडस टॉवर्सचे १८ टक्के म्हणजेच सुमारे ४८.४७ कोटी समभाग विकले आहेत. या समभाग विक्रीतून सुमारे १५,३०० कोटी रुपये म्हणजेच १.७ अब्ज युरोचा निधी उभा राहिला आहे. परिणामी त्यातून भारतातील व्होडाफोनवर असलेल्या बहुतांश कर्जाचा डोंगर कमी होण्यास मदत होईल. या समभाग विक्री व्यवहारानंतरही, इंडस टॉवर्सच्या सुमारे ८.२५ कोटी समभागांची अर्थात ३.१ टक्के हिस्सेदारी व्होडाफोनकडे राहणार आहे.

हेही वाचा : Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

बुधवारच्या सत्रात इंडस टॉवर्सचा समभाग ३.०६ टक्क्यांच्या घसरणीसह ३३४ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या बाजार भावानुसार, कंपनीचे ९० हजार कोटींचे बाजार भांडवल आहे.

भारती एअरटेलकडून खरेदी

दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या भारती एअरटेलने इंडस टॉवर्समधील हिस्सा १ टक्क्यांनी वाढवला आहे. भारती एअरटेलने सुमारे २.७ कोटी समभाग खरेदी केले आहेत. या व्यवहारानंतर, इंडस टॉवर्समधील एअरटेलची हिस्सेदारी पूर्वीच्या ४७.९५ टक्क्यांवरून वाढून ४८.९५ टक्क्यांवर पोहोचली आहे.